
हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले प्रभादेवी येथील मारुती मंदिर पालिकेला हाताशी धरून पाडण्यासाठी भिंतीवर बुलडोझर फिरवणाऱ्या इंडिया बुल्स स्काय सोसायटीचे कारस्थान शिवसेनेने उधळून लावल्यानंतर ही भिंत आता नव्याने बांधण्यात आली आहे. त्यामुळे जोरजबरदस्तीने मंदिर तोडण्याचा डाव फसला असून भाजपच्या नकली हिंदुत्वाला चपराक बसली आहे. या कारवाईबाबत दै. ‘सामना’मध्ये शनिवारी वृत्त प्रसिद्ध झाले होते.
प्रभादेवी येथील इंडिया बुल्स स्काय टॉवर सोसायटीजवळ हे पुरातन मंदिर आहे. या मंदिर परिसरात इंडिया बुल्स स्काय ही आलीशान रहिवासी इमारत आहे. या मंदिराची जागा आपल्या मालकीची असल्याचे सांगत जीर्णोद्धाराच्या नावाखाली इंडिया बुल्स सोसायटीकडून पालिकेच्या माध्यमातून मंदिर हटवण्याच्या हालचाली सुरू आहेत. या कारवाईत शुक्रवारी मंदिराच्या उजव्या बाजूकडील भिंत बुलडोझरने हटवण्यात आली. याची माहिती मिळताच शेकडो शिवसैनिक, भाविकांनी कारवाई करू देणार नाही, अशी भूमिका मांडली. यावेळी आंदोलकांचा रुद्रावतार पाहून बिथरलेल्या पालिका प्रशासनाने कारवाई थांबवत बुलडोझर मागे फिरवले होते.
कामावर जाणारे शेकडो मुंबईकर एल्फिन्स्टन पुलाजवजळील मंदिरात दर्शन घेऊनच कामावर जातात. शिवाय प्रत्येक शनिवार आणि सणासुदीच्या दिवसांमध्येही या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हे मंदिर हटवू देणार नाही, अशी भूमिका शिवसेनेसह भाविक-स्थानिक नागरिकांनी घेतली आहे.
देश-राज्यात भाजपची सत्ता आणि लोकप्रतिनिधी नसताना राज्य सरकारचे वर्चस्व असलेल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून मारुती मंदिरावर कारवाई केलीच कशी जाऊ शकते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यातच शिवसेनेच्या दणक्यानंतर मंदिरावरील कारवाई थांबवल्याने भाजपच्या बेगडी हिंदुत्वाला चपराक बसली आहे.