
दक्षिण मुंबईतील ओपेरा हाऊस येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका घरकमा करणाऱ्या महिलेवर त्याच घरातील चालकाने बलात्कार केला. यानंतर महिलेचे अश्लील फोटो काढले आणि तिला ब्लॅकमेल करून तिच्याकडून पैसे उकळले. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पीडित महिला ओपेरा हाऊस परिसरात एका घरात घरकाम करते. ती ज्या घरामध्ये काम करते त्याच घरमालकाच्या ड्रायव्हरने महिलेशी आधी ओळख वाढवली. दोघे एकाच गावचे असल्याने दोघांमध्ये मैत्री झाली. या मैत्रीचा गैरफायदा घेत ड्रायव्हरने महिलेला खोटं सांगून हॉटेलमध्ये भेटायला बोलावले.
महिला हॉटेलमध्ये गेल्यानंतर आरोपीने तिला अंमली पदार्थ मिसळलेले थंड पेय प्यायला दिले. हे पेय प्यायल्यानंतर महिला बेशुद्ध पडली. शुद्धीवर आली तेव्हा ती नग्नावस्थेत होती. आरोपीने तिचे अश्लील फोटो, व्हिडिओ काढले होते. महिलेने फोटो डिलिट करण्यास सांगितले असता आरोपीने तिला धमकावून पैसे उकळले. आरोपीने एका साथीदाराच्या खात्यात महिलेच्या खात्यातून 85 हजार रुपये ट्रान्सफर केले.
या घटनेनंतर महिला तिच्या गावी निघून गेली. मात्र आरोपीने तरीही तिची पाठ सोडली नाही. आरोपीने ऑगस्टमध्ये तिला पुन्हा त्याच हॉटेलमध्ये बोलावून जुने फोटो दाखवून तिला धमकावत तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. यानंतरही आरोपी थांबला नाही. त्याने सप्टेंबरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. अखेर आरोपीच्या या अत्याचाराला कंटाळून महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली.
महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला वाळकेश्वर परिसरातून अटक केली. आरोपीचा मोबाईल जप्त करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. आरोपीने याआधीही कोणत्या महिलेसोबत असे केले का याबाबत पोलीस तपास करत आहेत.




























































