Mumbai News – मालाडमध्ये दुचाकी डंपरला धडकल्याने अपघातात तरूणाचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

दुचाकी डंपरला धडकल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला एक गंभीर जखमी झाला आहे. निखिल कद्रे असे मयत तरूणाचे तर सुमित खैरनार असे जखमी तरुणाचे नाव आहे. सुमितला उपचारासाठी ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मालाड पूर्वेकडील पठाणवाडी उड्डाणपुलावर रविवारी पहाटे 1.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी कुरार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

निखिल हा गोरेगावमधील आरे कॉलनीत तर सुमित मुकुंदनगरमधील रहिवासी आहे. दोघेही शनिवारी रात्री मालाड येथील हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. जेवून घरी परतत असताना पठाणवाडीतील उड्डाणपुलावर ही घटना घडली. निखिलने अचानक ब्रेक लावला आणि उजवीकडे वळला असता पुढे जाणाऱ्या डंपरला धडकला. यात दोघांनाही गंभीर दुखापत झाली. दोन्ही जखमींना जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात नेण्यात आले. निखिलला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर खैरनारवर उपचार सुरू आहेत.

घटनेनंतर डंपर चालक वाहन सोडून घटनास्थळावरून पळून गेला. कुरार पोलिसांनी त्याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवत त्याचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी फॉरेन्सिक आणि मेकॅनिकल तपासणीसाठी अपघातस्थळावरून सोडून दिलेला डंपर जप्त केला आहे. फरार चालकाची ओळख पटविण्यासाठी आणि त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि आसपासच्या भागातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत.