जिवाची मुंबई झाली जेवायची मुंबई! नरिमन पॉइंटपासून बीकेसीपर्यंत ‘नाइटलाइफ’ला उत्तम प्रतिसाद

3678

मुंबई कधीही थांबत नाही. मुंबई चोवीस तास ऍलर्ट असते. या स्वप्ननगरीत प्रत्येकाला यावंस वाटतं. मुंबईत कुणीही उपाशी राहत नाही. इथे येणाऱया प्रत्येकाला मुंबई भरभरून देते. रविवारी मध्यरात्रीपासून मुंबईने चोवीस तास पोटभर देण्यास सुरुवात केली. मुंबापुरीत ‘नाइट लाइफ’ सुरू झाले. जिवाची मुंबई ‘जेवायची मुंबई’ही झाली. आता रात्री-अपरात्रीही मुंबईत खाण्यापिण्याची ददात नाही. नाइट लाइफमुळे मुंबईतील चौपाटय़ांवरील खाद्यपदार्थांची दुकाने, मॉल्स रात्रभर गजबजले होते. आज दुसऱया रात्री या नाइट लाइफला मुंबईकरांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची नाइट लाइफची संकल्पना प्रत्यक्षात उतरली. हॉटेल, मॉल्स आणि रेस्टॉरंटवाल्यांनीही त्याला चांगला प्रतिसाद दिला. गिरगाव, जुहू, वरळी, वांद्रे येथील चौपाटय़ांवरील खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर आज मध्यरात्रीही खवय्यांची गर्दी दिसून आली. मॉल्समधील झगमगाटही रात्रभर सुरू होता. तेथील मॅक्डोनल्ड्स व अन्य हॉटेलांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसून आली. मध्यरात्री बाहेर असूनही कुणाच्याही चेहऱयावर असुरक्षिततेची भावना नव्हती. प्रत्येक जण नाइट लाइफचा आनंद घेताना दिसला. अनेक ठिकाणी संबंधित अधिकाऱयांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतल्याचे समजते. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीसही दक्ष होते.

जगात अशी अनेक शहरे आहेत जिथे आयुष्यात एकदा तरी फिरायला जावे असे अनेकांना वाटते. फ्रान्समधील पॅरिस, नेदरलँडमधील ऍमस्टरडॅम, थायलंडमधील बँकॉक, जपानचे टोकियो आदी शहरांमध्ये दिवसापेक्षा रात्री फिरण्यात खरी मजा असते. रात्रीच्या वेळी या शहरांचा नजारा पाहण्यासारखा असतो. रात्रीच्या वेळी या शहरांचे सौंदर्य अधिक खुलते. या शहरांमधील नाइट लाइफ पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक तिथे जात असतात. तिथे रात्रीच्या वेळी फिरण्याचा, खरेदीचा आनंद घेतात. येणाऱया काळात मुंबईही या शहरांच्या पंक्तीत जाऊन बसेल आणि मुंबईच्या पर्यटनाला अधिक चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

नाइट लाइफ कुठे?

मुंबई २४ तासमध्ये मुंबईतील रेस्टॉरंटप्रमाणे मोठे मॉलसुद्धा चालू ठेवले जाणार आहेत. गिरगाव चौपाटी, जुहू, वरळी सी फेस, वांद्रे बँडस्टँड, नरिमन पॉइंट रोड आणि एनसीपीए कॉर्नर या ठिकाणी फूड ट्रक म्हणजे वाहनावरील उपाहारगृह लावण्यास परवानगी दिली जाईल; पण एका ठिकाणी पाच फूड ट्रक उभे राहतील. जे रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहतील. नाइट लाइफमध्ये पब आणि बारचा समावेश नाही. रात्री दीड वाजल्यानंतर दारू बंद असणार आहे. रात्री दीड वाजेपर्यंंतच मद्यविक्रीस परवानगी असणार आहे.

मुंबई सुरक्षित आणि तशीच राहील!

नाइट लाइफ हा एका दिवसाचा फेस्टिव्हल नाही. जेव्हा रात्री उशिरापर्यंत बाहेर येणे आणि आनंद घेणे आपल्यासाठी सुरक्षित आहे हे लोकांना समजण्यास सुरुवाात होईल त्यावेळी ही एक लाइफस्टाइल होईल. मुंबई ही सर्वांसाठी सुरक्षित आहे आणि तशीच राहील, असा विश्वास पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. नाइट लाइफ संकल्पना आणि त्याअंतर्गत देण्यात येणाऱया सेवा याबाबत जागरूकता नसतानाही ‘मुंबई 24 तास’ला पहिल्याच रात्री लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. नाइट लाइफ पॉलिसीनुसार सुरक्षा आणि कचरा प्रक्रिया करण्याच्या निकषांचे पालन करणाऱया दुकानांना यामध्ये परवानगी देण्यात आली आहे. हळूहळू या संकल्पनेला मुंबईत गती मिळेल, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

हॉटेल चालकांकडून स्वागत

मुंबईतील नेहमी गजबजलेल्या भागातील नरिमन पॉईंट, काळाघोडा भागात 24 तास हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी मिळाली. या भागात पिझा बाय द बे, आयनॉक्स, मॅक्डोनाल्ड, कॉपर चिमणी, चेतना, पंजाब ग्रील यासारखी गजबजणारी रेस्टॉरंटस आहेत. या सर्वांनीच या निर्णयाचे स्वागत केले आहे. मुंबई कधी झोपत नाही त्यामुळे येथील नागरिकांना दिवसरात्र जेवणाची व्यवस्था देण्यास आम्ही तयार आहोत. या निर्णयाचा आज दुसराच दिवस आहे. अनेकांना याची माहिती अद्याप नाही. यासाठी आवश्यक स्टाफ तसेच अन्य परवानग्यांबाबत आम्हीही लवकरच निर्णय घेऊ, असे इथल्या हॉटेल चालकांचे म्हणणे आहे. आयनॉक्स थिएटरकडूनही याबाबत लवकरच निर्णय अपेक्षित असल्याचे येथील प्रशासनाचे म्हणणे आहे.

काळाघोडासारख्या भागात ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबवता येईल. फेब्रुवारी महिन्यापासून या ठिकाणी काळाघोडा फेस्टिव्हल सुरू होत आहे. अशा वेळी या निर्णयाची खऱया अर्थाने अंमलबजावणी होईल. यावेळी मोठय़ा प्रमाणावर येणाऱया गर्दीसाठी हा फेस्टिव्हल 24 तास सुरू राहिल्यास रेस्टॉरंटही गजबजतील. त्याचप्रमाणे जशी लोकांना माहिती होईल तशी गर्दीही वाढेल, अशी प्रतिक्रिया एका हॉटेल व्यवस्थापकाने दिली.

आपली प्रतिक्रिया द्या