
राज्यात गोवर बाधितांचा आकडा वाढतच असून संशयितांची संख्या आज 14 हजार 880 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत गोवरमुळे एकूण 17 मुलांचा मृत्यू झाला असून बाधितांची संख्या 951 झाली आहे. तर मुंबईत आज एकाच दिवसांत 10 गोवरबाधित आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून विशेषतः मुंबई महानगर परिसरासह मालेगाव, भिवंडी, पिंपरी चिंचवड, पनवेल, रायगड, जळगाव, धुळे आदी ठिकाणी गोवर रुग्णांची संख्या वाढत आहे. विषाणूजन्य गोवर आजार लसीकरणामुळे टाळता येतो. हा आजार मुख्यत्वेकरून पाच वर्षांखालील मुलांमध्ये आढळतो. ताप, खोकला, वाहणारे नाक, डोळ्यांची जळजळ, सुरुवातीला चेहर्यावर आणि नंतर संपूर्ण शरीरावर लाल, सपाट पुरळ ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. गोवरमुळे काही मुलांमध्ये अतिसार, कर्ण संसर्ग, न्युमोनिया, क्वचित फेफरे, अंध्यत्व किंवा मेंदू संसर्ग अशी गुंतागुंत होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाकडून राज्यभरात जनजागृती, लसीकरण आणि संशयित-बाधितांवर आवश्यक उपचार केले जात आहेत.
15 डिसेंबरपासून विशेष लसीकरण मोहीम
राज्यात वाढत्या गोवर रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर 14 डिसेंबर रोजी राज्यव्यापी वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये राज्याच्या टाक्सपर्ह्समधील तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहेत. तर 15 डिसेंबर ते 25 डिसेंबर या कालावधीत गोवर प्रतिंबधक लसीकरणाची विशेष मोहिमेचा पहिला टप्पा तर 15 जानेवारी 25 जानेवारी 2023 या कालावधी विशेष लसीकरण मोहिमेचा दुसरा टप्पा राबवण्यात येणार आहे.
मुंबईत 4890 संशयित
– मुंबईत आज दिवसभरात 51 गोवर संशयित रुग्ण आढळले असून 10 जणांमध्ये गोवरचे निदान झाले आहे. यामुळे मुंबईतील गोवर संशयिताची संख्या 4890 झाली असून बाधितांचा आकडा 457 वर पोहोचला आहे.
– मुंबईत सद्यस्थितीत विविध ठिकाणी 40 जण रुग्णालयात दाखल आहेत. तर आज 35 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. गोवरला आळा घालण्यासाठी पालिकेकडून आतापर्यंत 82 लाख 57 हजार 292 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले असून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
































































