
दृष्टिहीन व्यक्तींना अनेकदा औषधांसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागते. त्यांची हीच अडचण दूर करण्यासाठी दादरच्या नायगाव येथील सुमित पाटील या तरुणाने पुढाकार घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर त्याने टाकाऊ प्लॅस्टिकपासून ब्रेल लिपीमध्ये मराठी आणि इंग्रजी भाषेतून औषधांची पाकिटे तयार केली आहेत. त्यामुळे औषधांच्या बाबतीत दृष्टिहीनांना इतरांवर अवलंबून राहावे लागणार नाही.
पेशाने कलादिग्दर्शक असलेला सुमित पाटील गेल्या 15 वर्षांपासून दृष्टिहीनांसाठी काम करतोय. दृष्टिहीनांना दैनंदिन आयुष्यात येणाऱया अडचणी दूर करून त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी तो सतत निरनिराळे प्रयोग करत असतो. दृष्टिहीनांसाठी गंधांवरून ओळखता येणारे रंग (रंगगंध) आणि रेडिअमची काठी अशा वस्तूंची निर्मिती केल्यानंतर आता त्याने ब्रेल लिपीमध्ये औषधांची पाकिटे तयार केली आहेत. प्रायोगिक तत्त्वावर त्याने सर्दी-खोकला, ताप, घसा संसर्ग यावरील औषधांची पाकिटे तयार केली आहेत. या कामात त्याला अरविंद पुरंदरे यांची मोलाची साथ मिळाली आहे. यापूर्वी युरोप, दुबईमध्ये ब्रेलमधील पाकीट कागदी तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु तो अयशस्वी ठरला, कारण कागदावरील प्रिंटमुळे ब्रेलमधील अक्षर पुसट होऊन दिसेनाशी होत होती.
प्लॅस्टिकचा वापर करून ही पाकिटे बनवल्यामुळे ती 20 ते 25 वर्षे सहज टिकू शकतात.
दृष्टिहीनांचे जीवन सुकर करण्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. ब्रेल लिपीमधील औषधांच्या पाकिटांमुळे दृष्टिहीन व्यक्तींना औषधे सहज ओळखता येतील आणि त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. भविष्यात औषध कंपन्या आणि सरकारनेदेखील पुढाकार घेऊन ब्रेल भाषेतील औषधांची पाकिटे तयार करावीत. – सुमित पाटील
- प्लॅस्टिकचा वापर करून ही पाकिटे बनवल्यामुळे ती 20 ते 25 वर्षे सहज टिकू शकतात.





























































