
रेल्वेच्या एका प्रवाशाची लोकलच्या प्रवासात 14 हजार 500ची रोकड, क्रेडिट कार्डस् आणि कागदपत्रांची विसरलेली बॅग रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सुखरूपपणे त्याच्याकडे सोपविल्याची घटना बुधवारी घडली. रेल्वेचे वेल्फेअर इन्स्पेक्टर अतुल रायकर, अन्य एक कर्मचारी सुमंत देऊलकर, विल्सन कोशे हे कल्याण रेल्वे स्कूलचे इन्स्पेक्शन करून परत येत असताना सीएसएमटीला उतरता त्यांना एक बॅग सापडली. या बॅगेत 14,500 रुपये आणि क्रेडिट कार्डस् आणि कागदपत्रे होती. त्यांनी ही बॅग स्टेशनमास्तर प्रवीण वायकर यांच्याकडे सोपविली. प्रवीण वायकर यांनी कागदपत्रावरील माहितीवरून शोएब शेख यांना कळविले, त्यानंतर त्यांना कार्यालयात बोलावून ही बॅग त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. शोएब यांनी ट्वीट करून मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
























































