प्लॅस्टिकविरोधी कारवाईत 4 कोटी 41 लाख दंड वसुली, सुमारे 15 लाख ठिकाणी छापेमारी

313
bmc

मुंबईसह राज्यभरात 23 जून 2018 पासून प्लॅस्टिकबंदी लागू झाल्यानंतर पालिकेने केलेल्या कारवाईत डिसेंबर 2019 अखेरपर्यंत 4 कोटी 41 लाख 50 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये 14 लाख 93 हजार 787 ठिकाणी तपासणी करून ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, आगामी काळात ही कारवाई तीक्र करणार असल्याचे पालिकेने जाहीर केले आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून पर्यावरणसंवर्धन आणि रक्षणासाठी मुंबईसह राज्यभरात 23 जून 2018 पासून प्लॅस्टिकबंदी लागू करण्यात आली. या पार्श्वभूमीवर पालिकेने बाजार, दुकाने-आस्थापना आणि अनुज्ञापन विभागातील 310 निरीक्षकांच्या माध्यमातून कारवाई सुरू आहे. निळा कोट आणि काळी टोपी घातलेल्या निरीक्षकांकडून विविध ठिकाणी तपासणी सुरू आहे. दरम्यान, पालिकेने केलेल्या कारवाईत 14 लाख 93 हजार 787 ठिकाणी तपासणी करण्यात आली. यामध्ये 81 हजार 793.226 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे. 650 ठिकाणी कारवाई सुरू असून केलेल्या कारवाईत एकूण 4 कोटी 41 लाख 50 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

फेब्रुवारीपासून मुंबईत प्लॅस्टिकचे रस्ते

फेब्रुवारीपासून मुंबईत प्लॅस्टिकचे मजबूत आणि टिकाऊ रस्ते बनविण्यात येणार आहेत. रोड मटेरियलमध्ये 5 ते 10 टक्के प्लॅस्टिकचा वापर करावा यासाठी टेंडर काढताना तशी अट बंधनकारक करावी यासाठी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी अधिकाऱयांना निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे प्लॅस्टिक पुनर्वापराला चालना मिळणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 15 फेब्रुवारीपासून होणार असल्यामुळे प्लॅस्टिकमुक्ती आणि पर्यावरणसंवर्धनासाठी मदत होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या