
मुंबई प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी पालिका अनेक महत्त्वाचे उपक्रम राबवत असताना आता एक किलो प्लॅस्टिक कचऱयाच्या बदल्यात एक वेळचे जेवण तर अर्धा किलो प्लॅस्टिक कचऱयाच्या बदल्यात एक वेळचा नाश्ता असा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत शिवसेनेने मांडलेल्या ठरावाच्या सूचनेला आज पालिकेच्या महासभेने मंजुरी दिली.
पर्यावरण रक्षण आणि संवर्धनासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईसह राज्यभरात 23 जून 2018 पासून प्लॅस्टिकबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून ‘सिंगल युज डिस्पोजेबल प्लॅस्टिकमुक्त’ करण्यासाठी कारवाई करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्लॅस्टिकची समस्या प्रभावीपणे सोडवण्यासाठी शिवसेना नगरसेविका सुजाता पाटेकर यांनी महासभेत ठरावाची सूचना मांडताना एक किलो प्लॅस्टिक कचऱयाच्या बदल्यात एक वेळचे जेवण आणि 500 ग्रॅम प्लॅस्टिक कचऱयाच्या बदल्यात एक वेळचा नाश्ता द्यावा अशी कल्पना मांडली आहे. याला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिल्यामुळे सदर ठरावाची सूचना मंजूर झाल्याची घोषणा महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिकेच्या महासभेत केली. आयुक्तांच्या अभिप्रायानंतर या निर्णयाच्या अंमलबजावणी होणार आहे.
छत्तीसगडमधील अंबिकापूरच्या धर्तीवर निर्णय
छत्तीसगड राज्यातील अंबिकापूर शहरात कचरावेचकांना एक किलो प्लॅस्टिक कचऱयाच्या बदल्यात एक वेळचे जेवण आणि अर्धा किलो प्लॅस्टिक कचऱयाच्या बदल्यात एक वेळचा नाश्ता दिला जातो. तर कचरावेचकांनी जमा केलेल्या प्लॅस्टिकचा वापर बांधकाम, रस्त्याच्या कामांसाठी केला जातो. असा उपक्रम राबवल्यामुळे अंबिकापूर शहराने स्वच्छ शहरात देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे असा अभिनव उपक्रम पालिकेने राबवावा अशी मागणी सुजाता पाटेकर यांनी केली.



























































