
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळ स्फोटके असलेली गाडी सापडल्यानंतर त्याची गंभीर दखल घेत शनिवारी रात्री शहरात मुंबई पोलिसांनी ‘ऑपरेशन ऑल आऊट’ राबवले. या ऑपरेशनमध्ये पोलिसांनी 217 ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवून 38 फरारी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. तर दारू पिऊन वाहने चालवणाऱया 31 जणांना पोलिसांनी अटक केली.
मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या मार्गदर्शनखाली शनिवारी रात्री शहरात ‘ऑपरेशन ऑल आऊट’ राबवले गेले. 93 पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे आपल्या हद्दीत कारवाई करत होते. सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे-पाटील हे नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपेरेशनच्या ठिकाणी भेटी देऊन पोलीस अधिकाऱयांना मार्गदर्शन करत होते. ‘ऑल आऊट ऑपरेशन’दरम्यान फरार असलेल्या 38 जणांना पोलिसांनी अटक केली, तर 217 ठिकाणी नाकाबंदी लावून 10 हजार 715 वाहनांची तपासणी केली. ड्रग्जप्रकरणी पोलिसांनी 87 जणांवर कारवाई केली असून अवैध शस्त्र्ा बाळगणाऱया 32 जणांना पोलिसांनी अटक केली. तर 29 भिक्षेकरू आणि वाघरींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. पोलिसांनी ऑपरेशनदरम्यान 951 हॉटेल्स, लॉजची तपासणी केली. अवैध धंदे करणाऱया 54 जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. तर 23 तडीपार आरोपींविरोधात महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार कारवाई केली.



























































