पुष्पा, वुई हेट रूल ब्रेकर्स! कोरोनाविरोधात फिल्मी स्टाईलने मुंबई पोलिसांनी केली जनजागृती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने आखून दिलेल्या नियमांचे कोणीही उल्लंघन करू नये यासाठी मुंबई पोलिसांनी राजेश खन्ना यांच्या लोकप्रिय डायलॉगचा आधार घेत ‘पुष्पा, वुई हेट रूल ब्रेकर्स’ अशी भन्नाट पोस्ट शेयर केली आहे. सोबतच राजेश खन्ना यांच्या नावाचा कल्पकतेने वापर करत ‘राजेश, ऑर्डर ‘खाना’ अॅट होम’ असे म्हटलेय. पोलिसांच्या या भन्नाट ट्विटचे नेटिझन्सने कौतुक केले आहे.

मुंबई पोलीस नेहमीच हटके स्टाईलने  ट्विट करत नागरिकांमध्ये विविध विषयांवर जनजागृती करतात. शुक्रवारी पोलिसांनी राजेश खन्ना, बिग बी, काजोल आणि आयुष्मान खुराना या कलाकारांच्या नावाची, त्यांच्या गाजलेल्या डायलॉगची आणि टायटलची सांगड घालत भन्नाट पोस्ट शेअर केल्या आहेत. चेहऱयावर व्यवस्थित मास्क न लावणाऱयांसाठी बिग बी यांच्या डायलॉगचा आधार घेत ‘ऐसे मास्क पहनना भी कोई मास्क पहनना है लल्लू’ अशी पोस्ट शेयर करण्यात आलीय.

काजोल–आयुष्मानने केले कौतुक

काजोलच्या ‘फना’ मधील गाण्याची आणि ‘प्यार किया तो डरना क्या’ चित्रपटाच्या टायटलची सांगड घालत ‘मेरे हाथ मे सॅनिटायझर है, राज! कारण सॅनीटाईज किया तो डरना क्या’ असा भन्नाट डायलॉग शेयर केला आहे. गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी बाहेर पडणाऱयांसाठी आयुष्मानच्या चित्रपटांच्या टायटलचा आधार घेत ‘ड्रीम गर्ल’ला भेटायला जाणे तुम्हाला महागात पडू शकते, त्यामुळे अशा ‘वेबकुफिया’ टाळा असा संदेश दिलाय. दरम्यान, काजोल आणि आयुष्यमान यांनी मुंबई पोलीसांच्या पोस्टचे कौतुक केले असून त्यांनी देखील फिल्मी अंदाजात चाहत्यांना घरीच सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.