प्रदूषणामुळे आझाद मैदानावरील शेकडो आंदोलक आजारी, सर्दी-खोकल्याने हैराण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील प्रदूषणाचा त्रास आझाद मैदानावर आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱया शेकडो आंदोलकांना होऊ लागला आहे. अनेक जण सर्दी- खोकल्याने हैराण झाले आहेत. घशाच्या इन्फेक्शनमुळे पाण्याचा घोटही त्यांच्या गळय़ाखाली जाईनासा झाला आहे. त्या परिस्थितीतही आंदोलक आझाद मैदानावर ठाण मांडून आहेत, पण निर्दयी मिंधे सरकारने त्यांच्या आंदोलनाला गांभीर्याने घेतलेले नाही.

आझाद मैदानावर विविध संघटनांच्या नेतृत्वाखाली आंदोलने सुरू आहेत. पीएचडी संशोधक विद्यार्थी त्यांना सरसकट फेलोशिप मिळावी या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत, बेस्ट प्रशासनाचे कर्मचारी सेवानिवृत्तीनंतरच्या लाभासाठी आंदोलन करत आहेत, कोविड महामारीमध्ये डेटा एण्ट्री ऑपरेटर म्हणून सरकारने कामावर घेतले आणि कोविडनंतर काढून टाकले असे शेकडो कर्मचारी न्याय मागत आहेत, शिक्षक मंडळीही त्यांच्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर ठाण मांडून आहेत.

आझाद मैदानावर उघडय़ावर बसलेल्या या सर्व आंदोलनकर्त्यांना आता मुंबईतील प्रदूषणामुळे त्रास होऊ लागला आहे. एकीकडे प्रदूषण कमी करण्यासाठी मिंधे सरकारने उपाययोजना राबवण्याची घोषणा केली; परंतु दुसरीकडे या आंदोलकांचा प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी सरकारने काहीच विचार केलेला नाही. अनेक आंदोलक हे मुंबईबाहेरून आले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईकही नाहीत. त्यामुळे आजारी पडल्याने आता काय करावे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

27 जणांना घशाचे इन्फेक्शन

महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समितीच्या नेतृत्वाखाली जवळपास 50 जण फेलोशिपच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. त्यातील 27 जणांना सर्दी-खोकला, घशाचे इन्फेक्शन असे त्रास होत आहेत. खोकून-खोकून अनेकांचा घसा सुजला आहे. अन्नाचा घास गिळणेही कठीण होऊन बसले आहे. अशा परिस्थितीतही आम्ही आंदोलन करत आहोत. सरकारचे प्रतिनिधी भेटायला आले, पण त्यांनी या त्रासाकडे दुर्लक्ष केले. त्यांना फक्त आंदोलन मागे घेण्याचेच पडले आहे, आमच्या मागण्यांचे काहीच सोयरसूतक नाही, असे समितीचे सद्दाम मुजावर यांनी सांगितले.