मुंबईतील खासगी दवाखाने, रुग्णालये खुले ठेवण्याचे आदेश

1260

‘कोविड करोना 19’ च्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या ‘लॉक डाऊन’ मधून खासगी दवाखाने, पॅथॉलॉजी लॅब, मेडिकल स्टोअर्स यांना वगळण्यात आले असून त्यांनी या काळात आपल्या सेवा नियमितपणे देणे आवश्यक आहे. मात्र, असे असले तरी अनेक ठिकाणी खासगी दवाखाने, पॅथॉलॉजी लॅब, मेडिकल स्टोअर्स बंद ठेवण्यात येत असल्याचे आज संपन्न झालेल्या एका विशेष बैठकीदरम्यान नगरसेविका, नगरसेवक यांनीही निदर्शनास आणून  दिले. यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे‌. ही बाब लक्षात घेऊन बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व खाजगी दवाखाने, पॅथॉलॉजी लॅब, मेडिकल स्टोअर्स खुले ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त  प्रवीण परदेशी यांनी आज दिले आहेत.

राज्यात लागू करण्यात आलेल्या ‘साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897’ नुसार ‘महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना नियम 2020’ अन्वये महापालिका आयुक्त यांना देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून हे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशानुसार ‘ताप – सर्दी – खोकला’ अशी ‘कोविड कोरोना 19’ची लक्षणे नसणाऱ्या व्यक्तींवर वैद्यकीय व आरोग्य विषयक औषध उपचार हे खासगी दवाखान्यात करण्यात येतील. तर ‘कोविड कोरोना 19’ ची लागण झाल्यासारखी लक्षणे असणाऱ्या, म्हणजेच ‘ताप – सर्दी – खोकला’ असणाऱ्या व्यक्तींवर महापालिकेच्या दवाखान्यात किंवा महापालिकेच्या रुग्णालयात अथवा महापालिकेने ‘कोरोना‌’ विषयक उपचारांसाठी प्राधिकृत केलेल्या मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येतील.


महापालिका सर्व विभागांमध्ये  सुरू करणार फिव्हर क्लिनिक

‘ताप – सर्दी – खोकला’ असणाऱ्या व‌ ‘कोरोना कोविड 19’ सदृश लक्षणे असणाऱ्या व्यक्तींवर उपचार करण्यास अधिक पर्याय उपलब्ध व्हावेत, यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्न करत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून महापालिकेच्या सर्व विभागांमध्ये लवकरच महापालिकेची ‘फिवर क्लिनिक’ सुरू होत आहेत. त्याचबरोबर झोपडपट्टी परिसरांमध्ये या अनुषंगाने वैद्यकीय शिबिर घेण्याचेही नियोजन महापालिकेच्या स्तरावर करण्याचा निर्णय आज महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मार्गदर्शनात व महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या नगरसेविका, नगरसेवक यांच्या विशेष बैठकीत घेण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या