सक्षम उदंचन केंद्रांमुळे मुंबईत हजारो कोटी लिटर पाण्याचा उपसा, 870 तास पंप कार्यरत

731

मुंबईची वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता अतिवृष्टीच्या काळात शहरात पडणार्‍या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी महापालिका क्षेत्रात एकूण 6 उदंचन केंद्र (पंपींग स्‍टेशन) कार्यरत आहेत. या उदंचन केंद्रामध्‍ये एकूण 43 पंप असून यापैकी प्रत्‍येक पंपाची क्षमता प्रति सेकंदाला 6 हजार लिटर पाण्‍याचा उपसा करण्‍याची आहे. याचाच अर्थ सर्व पंपांची एकत्रित क्षमता ही प्रत्‍येक सेंकदाला 2 लाख 58 हजार लिटर एवढ्या पाण्‍याचा उपासा करण्‍याची आहे. दिनांक 3 ऑगस्‍ट रोजी संध्‍याकाळ पासून बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पावसाला सुरुवात झाली. तेव्‍हापासून ते 6 ऑगस्‍ट रोजी सकाळी 7 वाजेपर्यंतच्‍या साधारपणे 4 दिवसांच्‍या कालावधीत सर्व उदचन केंद्रामधून तब्‍बल 1 हजार 714 कोटी लिटर एवढया पाण्‍याचा उपसा करण्‍यात आला. तुलनात्‍मक विचार केल्‍यास 8 हजार 46 दशलक्ष लिटर एवढी जलधारण क्षमता असणार्‍या तुळशी तलावातील पाण्‍याच्‍या दुपटीपेक्षा अधिक पाण्‍याचा उपसा गेल्‍या 4 दिवसांत करण्‍यात आला आहे, असे म्‍हटल्‍यास वावगे ठरणार नाही.

 3 ऑगस्‍ट ते 6 ऑगस्‍ट या 4 दिवसांच्‍या कालावधी दरम्‍यान पावसाच्‍या पाण्‍याचा सर्वाधिक उपसा हा लवग्रोव्‍ह उदंचन केंद्राद्वारे करण्‍यात आला. या केंद्राद्वारे 4,484.88 दशलक्ष लिटर एवढया पाण्‍याचा उपसा करण्‍यात आला. या खालोखाल हाजी अली उदंचन केंद्रातून 3,322.80 दशलक्ष लिटर, क्लिव्‍हलॅंड बंदर उदंचन केंद्रातून 2,766.96 दशलक्ष लिटर, इर्ला उदंचन केंद्रातून 2,533.68 दशलक्ष लिटर, ब्रिटानिया उदंचन केंद्रातून 2,484.36 दशलक्ष लिटर आणि गजदरबंध उदंचन केंद्रातून 1552.32 दशलक्ष लिटर पाण्‍याचा उपसा करण्‍यात आला.

यानुसार सर्व 6 उदंचन केंद्राद्वारे 17,145 दशलक्ष लिटर पाण्‍याचा उपसा करण्‍यात आला. यानुसार पाण्‍याचा उपसा करण्‍यासाठी सर्व 6 उदंचन केंद्रामध्‍ये कार्यरत असलेल्‍या पंप हे दिनांक 3 ऑगस्‍ट ते 6 ऑगस्‍ट  या 4 दिवसांच्‍या कालावधी दरम्‍यान सर्व पंपांचा एकत्रितरित्‍या विचार केल्‍यास एकूण 870 तास व 23 मिनिटे कार्यरत होते. सर्व 6 उदंचन केंद्रामध्‍ये कार्यरत असणारे 43 पंपं हे उदंचन केंद्रांमध्ये वाहून येणार्‍या पावसाच्‍या पाण्‍याचा प्रमाणानुसार संगंणकीय प्रणालीद्वारे कार्यरत होतात.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात पडणार्‍या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी हाजीअली, लव्हग्रोव्ह (वरळी), क्लीव्हलँड बंदर (वरळी गाव), ब्रिटानिया (रे रोड), ईर्ला (जुहू) आणि गजदरबंध (सांताक्रूज) या प्रत्‍येक ठिकाणी एक याप्रमाणे 6 उदंचन केंद्रे कार्यरत असून यात 43 पंप कार्यरत आहेत. पावसाचे व उदंचन केंद्रांमध्ये वाहून येणार्‍या पाण्याचे प्रमाण लक्षात घेऊन हे पंप संगणकीय प्रणालीद्वारे कार्यरत होतात.

आपली प्रतिक्रिया द्या