बेफाम वेगामुळे जीवघेणे अपघात होत असले तरी वाहनचालकांची वेगाची ‘नशा’कमी होताना दिसत नाही. रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत परिवहन विभागाने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर राबवलेल्या विशेष मोहिमेत जानेवारी महिन्यात तब्बल 2301 वाहनचालकांवर अतिवेगाने वाहन चालवल्याने दंडात्मक कारवाई केली आहे. तर लेन कटिंग केल्याप्रकरणी 1550 जणांना दंडाचा दणका दिल्याचे समोर आले आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ताशी कमाल 80 किलोमीटर वेगाने वाहने चालवण्यास परवानगी आहे, मात्र अनेक वाहनचालक त्याहून अधिक वेगाने वाहने चालवत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्याला चाप लावण्यासाठी परिवहन विभागाने वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी विशेष पथके महामार्गावर तैनात केली आहेत. त्यांनी केलेल्या कारवाईत बेफाम वेगाने धावणारी 2301 वाहने आढळली असून लेन कटिंग केल्याप्रकरणी 1550, सीट बेल्ट न लावता गाडी चालवणे 1007, चुकीच्या ठिकाणी गाडी पार्क केल्याप्रकरणी 466 जणांवर कारवाई केली आहे, तर जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर आतिवेगाने चालणारी 50 वाहने आढळून आली आहेत.

























































