
कोरोना विषाणूंचा वाढता फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन कायम ठेवतानाच, थांबलेले अर्थचक्र सुरु व्हावे यासाठी काही निर्बंध शिथिल केले होते. परंतु थोडी ढील मिळताच लोकांनी कोरोनाचे संकट संपले आहे अशा अविर्भावात मुक्तपणे व्यवहार सुरु केले होते. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई- पुणे भागासाठी दिलेल्या सवलती रद्द केल्या आहेत. यापुढे अधिक काटेकोरपणे लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
२० एप्रिलपासून लॉकडाऊनच्या बाबतीत काही प्रमाणात शिथिलता आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. ग्रीन व ऑरेंज झोन बरोबरच मुंबई व पुणे परिसरात काही अटींसह निर्बंध शिथिल केले होते. सरकारने घातलेल्या अटी न पाळल्यास शिथिलता रद्द केली जाईल असा इशाराही दिला होता. परंतु थोडी ढील मिळताच काल मुंबई व पुण्यात बरेच लोक बाहेर पडले होते. मुंबईच्या टोल नाक्यांवर रांगा लागल्या होत्या. बाजारातील गर्दी वाढली होती. त्यामुळे १७ एप्रिल रोजी लॉकडाऊनबाबत काढलेल्या अधिसूचनेत आज बदल करून मुंबई व पुण्याला दिलेल्या सवलती रद्द करण्यात आल्या आहेत. सवलती रद्द करणारी दुरुस्ती आज करण्यात अधिसूचनेत करण्यात आली.

























































