
गणेशोत्सव काळात घातपाती कृत्य आणि अनुचित प्रकार घडू नये याची रेल्वे पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. दर्शनाच्या नावाखाली महिलांची छेडछाड आणि हुल्लडबाजीचे प्रकार रोखण्यासाठी रेल्वे पोलीस 6 प्रमुख स्थानकांत बॉडी कॅमेऱ्यांचा वापर करणार आहेत. तसेच सुमारे साडेतीन हजार रेल्वे पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
गिरणगावचे गणपती पाहण्यासाठी राज्यभरातून भाविक येत असतात. लालबाग, भायखळा, परळ, खेतवाडी येथील सार्वजनिक गणपती पाहण्यासाठी येणाऱयांची संख्या खूप असते. कोविड काळात निर्बंध असल्याने दोन वर्षांत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने साधेपणात उत्सव साजरा केला होता, पण दोन वर्षांनंतर यंदा मोठय़ा संख्येने भाविक गिरणगाव येथील प्रसिद्ध गणपतीच्या दर्शनासाठी येणार आहेत. गणेशभक्तांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांप्रमाणे रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी विशेष उपाययोजना केल्या आहेत. मध्य रेल्वेच्या दादर, करी रोड, परळ, चिंचपोकळी, भायखळा रेल्वे स्थानकांत आणि पश्चिम रेल्वेच्या दादर, लोअर परळ या स्थानकांत तगडा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
रेल्वे पोलिसांच्या सोबतीला आरपीएफचे, एमएसएफचे जवान आणि होमगार्ड असणार आहेत. घातपाती कारवाईचा विचार करून गर्दी होणाऱया स्थानकांत श्वान पथक गस्त करणार आहेत. तसेच दर्शनादरम्यान महिलांची छेडछाड आणि हुल्लडबाजींचे प्रकार होऊ नयेत म्हणून साध्या वेशात रेल्वे पोलीस तैनात केले जाणार आहेत. रेल्वे पोलीस पहिल्यांदाच बॉडी कॅमेऱयांचा वापर करून टिंगळटवाळ्या करणाऱयांवर नजर ठेवून असणार आहेत. नुकतेच रेल्वे पोलिसांना 16 बॉडी कॅमेरे मिळाले आहेत. त्यांचा वापर गणेशोत्सवात रेल्वे पोलीस करणार आहेत.
प्रत्येक स्थानकात मदत कक्ष
भाविकांच्या मदतीसाठी दादर, चिंचपोकळी, करी रोड, भायखळा रेल्वे स्थानकांत मदत कक्ष असणार आहे. तेथे वरिष्ठ पोलीस अधिकारी तैनात केले जाणार आहेत. त्याचप्रमाणे गर्दी रोखण्यासाठी स्थानकात पोस्टर चिकटवले जाणार आहे. मुखदर्शन ते नवसाच्या रांगेतून जाण्यासाठी मार्ग याची माहिती मेगाफोनवरून पोलीस देणार आहेत.
फलाटावर लहान मुले हरवण्याच्या घटना घडतात. त्यांना शोधण्यासाठी मिसिंग पर्सनची टीम आणि एनजीओचे पथक तैनात केले जाणार
गणेशोत्सवात कोकणात जाणाऱया मेल, एक्सप्रेसमध्ये गर्दीचे प्रकार होऊ नयेत म्हणून वेळापत्रकात बदल करण्याच्या केल्या सूचना
चोरी, पाकीटमारीचे प्रकार होऊ नयेत म्हणून क्राईम ब्रँचची पथके तैनात
सीसीटीव्ही कॅमेऱयाच्या माध्यमातून ठेवली जाणार नजर
वाहतूक कोंडीचे प्रकार होऊ नयेत यासाठी रेल्वे वाहतूक पोलिसांची मदत घेणार
दोन वर्षांनंतर यंदा गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. हुल्लडबाजीचे प्रकार करणाऱयांवर कडक कारवाई करण्यात येईल.
– संदीप भाजीभाकरे, पोलीस उपायुक्त
(पश्चिम रेल्वे लोहमार्ग पोलीस)



























































