कोविड तपासणीमुळे रेल्वे टर्मिनसवर रांगा, परराज्यातून कोविड पॉझिटिव्ह आल्याने खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्यातून येणाऱया रेल्वे प्रवाशांची मुंबईच्या विविध रेल्वे टर्मिनसवर आरोग्य तपासणी करण्यास प्रारंभ झाल्याने काही ठिकाणी रांगा लागल्याचे दृश्य होते. पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनसवर सकाळी मोठी रांग लागल्याने ‘सोशल डिस्टन्सिंग’ची समस्या निर्माण झाली. अनेक ठिकाणी कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण सापडल्याने त्यांची रवानगी कोविड उपचार केंद्रात करण्यात आली.

दिल्ली आणि इतर राज्यांत कोरोनाची दुसरी लाट आल्याने सरकारने येणाऱया विमान तसेच रेल्वे प्रवाशांची कसून आरोग्य तपासणी सुरू केली. पश्चिम रेल्वेच्या बोरीवली, वांद्रे, मुंबई सेंट्रल, दादर मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनस, सीएसएमटी, दादर, ठाणे स्थानकात परराज्यातून येणाऱया प्रवाशांची तपासणी करण्यात आली. बोरीवली स्थानकांत जयपूर एक्सप्रेसमधून आलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटीव्ह सापडल्याने त्याला बोरीवली कोविड उपचार केंद्रात हलविण्यात आले आहे. वांद्रे टर्मिनसवर सकाळी साडे अकराच्या सुमारास राजस्थान आणि गुजरातहून दोन एक्सप्रेस लागोपाठ आल्याने प्रवाशांची मोठी रांग लागल्याने ‘सोशल डिस्टन्सिंग’चा फज्जा उडाल्याचे चित्र होते. वांद्रे टर्मिनसवरही कोरोना पॉझिटीव्ह सापडल्याचे वृत्त आहे.

क्रु मेंबर व वैमानिकांना वगळण्याची मागणी

रस्ते मार्गे तसेच हवाई मार्गे आलेल्या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी जिल्हा कलेक्टरांच्या आदेशाने तपासणी नाके तयार करण्यात येऊन तपासणी केली जात आहे. तसेच ‘वंदे भारत’ मोहिमेतंर्गत अनेक राज्यातून विमानाद्वारे मालवाहतूक केली जात असल्याने अशा विमानातील क्रु मेंबर तसेच वैमानिकांची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केल्यास विमानांच्या वेळापत्रकावर परिणाम होईल अशी विनंती एअर इंडियाने केली आहे. त्यामुळे विमानांच्या क्रु मेंबर व वैमानिकांना या चाचणीतून वगळा अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.

पहिल्या दिवशी 9,779 प्रवाशांची तपासणी, 10 कोरोना पॉझिटिव्ह

मुंबईत दाखल झालेल्या 9, 779 प्रवाशांची आज रेल्वे स्थानकांवर तपासणी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 1079, मुंबई सेंट्रल येथे 3,400, दादर येथे 2 हजार प्रवाशांपैकी एक पॉझिटिव्ह, टिळक टर्मिनसमध्ये 315 प्रवाशांपैकी 3 पॉझिटिव्ह, वांद्रे टर्मिनस येथे 2,047 प्रवशांपैकी 5 पॉझिटिव्ह तर बोरिवली येथे उतरलेल्या 938 प्रवाशांपैकी एकजण कोरोना पॉझिटिव्ह आढळला.