मुंबईत पावसाची संततधार सुरूच, आज जोरदार सरी कोसळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत आजही पावसाचा जोर कायम असून दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. मात्र यामुळे लोकल आणि बेस्ट वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. दरम्यान, शनिवार, 8 जुलैलाही मुंबईत पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी कोसळतील, असा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे.  

जून अखेरीपासून मुंबईसह कोकणात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. गेले काही दिवस मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघरमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडत आहे तर गुरुवारी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला रेड अलर्ट देण्यात आला होता तो खरा ठरला.

रिक्षावर झाड पडून एक जखमी

मुंबईत संततधार पावसामुळे पडझडीच्या घटना सुरूच असून कांदिवलीत आज सकाळी 9.30 वाजता रिक्षावर झाड पडून एक जण जखमी झाला. त्याला तातडीने शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्याला घरी सोडण्यात आले, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. कविता यांनी दिली.

लोकल सेवा विस्कळीत

सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक बिघाड आणि मालगाडय़ांच्या अडथळ्यांमुळे आज पश्चिम रेल्वेसह मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत होती. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट स्थानक येथे दुपारी 3.30 च्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे अप आणि डाऊन लोकल  दहा–पंधरा मिनिटे उशीराने धावत होत्या. तर मध्य रेल्वेच्या लोकलही सकाळपासूनच विलंबाने धावत होत्या.

कोकणाला पावसाचा तडाखा; जगबुडीने गाठली धोक्याची पातळी

कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. खेडमधील जगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मंडणगडमधील खेम धरण तुडुंब भरले आहे तर सिंधुदुर्गातही धो धो पाऊस कोसळत आहे.