Mumbai Rain – गरज असेल तरच घराबाहेर पडा! पुढील 2 तास मुंबईसाठी महत्त्वाचे, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

फोटो - गणेश पुराणिक

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत असून अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईमध्ये गेले दोन दिवस पावसाने थोडी उघडीप दिली होती. मात्र शनिवारपासून पुन्हा एकदा मुंबईत पावसाचे धुमशान सुरू होत आहे. हवामान विभागाने मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला असून मुंबईसाठी पुढील दोन तास महत्त्वाचे आहेत.

मुंबई शहर, उपनगरातील आकाशात काळ्याकुट्ट ढगांनी गर्दी केली असून पुढील दोन तासात महत्त्वाचे आहेत. मुंबई, नवीन मुंबई आणि मध्य मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन करण्यात आले आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई शहर, उपनगर, ठाणे, रायगडमध्येही शुक्रवारी रात्रीपासून पावसाची रिमझिम सुरू आहे. मुंबईला आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगडला आज ऑरेंज आणि उद्या रेड अलर्ट देण्यात आला आहे. अशातच हवामान विभागाने मुंबईत पुढील दोन तास पावसाचे धुमशान होण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यावरील संकट गडद होण्याची शक्यता

दरम्यान, पावसाचा जोर वाढत असल्याने मराठवाडा आणि विदर्भात अस्मानी संकट आणखी गडद होण्याची भीती आहे. 27 सप्टेंबर रोजी पावसाची तीव्रता अधिक असण्याचा अंदाज आहे. हवामानतज्ञांच्या मते, मराठवाड्यात रात्रीच्या वेळी होणाऱ्या पावसामागे ‘डाऊनरफ्ट’ ही महत्त्वाची प्रक्रिया कारणीभूत आहे. दिवसा हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे ढगांमध्ये पाण्याची धारणक्षमता वाढते. रात्री तापमान कमी होताच हे ढग अचानकपणे कोसळतात आणि मुसळधार पाऊस पडतो. 12 सप्टेंबरपासून अशाच पद्धतीने विदर्भ, मराठवाडय़ात अनेक ठिकाणी रात्रभर मुसळधार पाऊस झाला आहे. याशिवाय हिमालय प्रदेशातील तापमानातील बदलामुळे ढगांची घनता वाढत असून त्याचा परिणाम म्हणून मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा तडाखा बसत आहे.

नांदेडला ‘ऑरेंज अलर्ट’, विष्णुपुरी प्रकल्पाचे 16, तर इसापूर धरणाचे 9 दरवाजे उघडले; सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

बंगालच्या उपसागरात अतिवृष्टीची स्थिती

बंगालच्या उपसागरातील वायव्य आणि लगतच्या मध्य भागावर निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा शुक्रवार, 26 सप्टेंबर सकाळी 11.30 वाजेपर्यंत कायम होता. हा पट्टा पश्चिमेकडे सरकत पुढील 12 तासांत वायव्य आणि लगतच्या पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात दाब कमी होऊन मुसळधार पावसाच्या स्थितीत जाण्याची शक्यता आहे. यानंतर हा कमी दाबाचा पट्टा दक्षिण ओडिशा-उत्तर आंध्र प्रदेश किनाऱ्यावरून पुढे सरकणार आहे. यामुळे राज्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

धाराशिव जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात; सर्व शाळांना सुट्टी जाहीर, प्रशासन अलर्ट