
मुंबई आणि उपनगरांमध्ये मागील २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शहराची जीवनवाहिनी असलेल्या मध्य रेल्वेच्या वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने सीएसएमटी-ठाणे आणि सीएसएमटी माखुर्द सेवा बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता पाण्याचा काही प्रमाणात निचरा झाल्याने लोकल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. असे असले तरी लोकल गाड्या ३० ते ४० मिनिटे उशिराने धावत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंत मिठी नदीच्या पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा १० मीटरवर पोहोचल्याने सायन, कुर्ला, माटुंगा, आणि दादरसह अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचले. यामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावरील लोकल गाड्या ३० ते ४० मिनिटे उशिराने धावत आहेत, तर काही मार्गांवर सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.
मुंबईच्या प्रमुख स्थानकांवर, विशेषत: सीएसएमटी, ठाणे, आणि कल्याण येथे प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक प्रवाशांना तासंतास थांबावे लागत असून, काहींनी पर्यायी वाहतूक साधनांचा वापर केला.