
मुंबई तब्बल तीन वर्षांनंतर आज कोरोनामुक्त झाली आहे. मुंबईत दिवसभरात 2 हजार 772 चाचण्या करण्यात आल्या. त्यात कोरोनाचा एकही नवा रुग्ण सापडला नाही. सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मुंबईत 16 मार्च 2020 मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण अंधेरीत सापडला होता. परदेशी प्रवास करून आलेल्या या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत गेली. कोरोनावरील लस बाजारात येण्याआधी महापालिकेने केलेल्या कोरोना नियमांमुळे लाखो प्राण वाचले. यात सार्वजनिक ठिकाणी मास्कसक्ती, त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, सार्वजनिक ठिकाणी योग्य अंतर ठेवून दैनंदिन व्यवहार करणे यासह कोरोना पसरू नये यासाठी वेळोवेळी हात धुवून संसर्गाला आळा घातला. युद्धपातळीवर जम्बो कोविड सेंटर्स उभारून ऑक्सिजन सिलिंडर्स, व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून दिले. केंद्र सरकारने कोरोना लस उपलब्ध झाल्यानंतर देशभरातील इतर राज्यांच्या तुलनेत अत्यंत जलदपणे लसीकरण मोहीम राबवत कोरोना नियंत्रणात ठेवला. रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांसाठी आपत्कालीन हेल्पलाईन 24 तास उलब्ध करून देत रुग्णवाहिका आणि वॉररूमही उभारले. कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महापालिका राबवत असलेल्या उपाययोजनांची दखल मुंबई उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयासह देशभराने तर घेतलीच पण त्याचबरोबर जगभरात कोरोना रोखण्यासाठीचे मुंबई मॉडेल आणि धारावी पॅटर्न नावाजला गेला.
मुंबईत 16 मार्च 2020 रोजी पहिला रुग्ण सापडला. मुंबईत आतापर्यंत 1 कोटी 15 लाख 5 हजार 240 रुग्ण सापडले आहेत. मुंबई महापालिकेने आतापर्यंत 18 कोटी 6 लाख 96 हजार 180 कोरोना चाचण्या केल्या आहेत. आतापर्यंत 19 हजार 747 रुग्णांचा मृत्यू झाला. यात वृद्ध तसेच एकापेक्षा जास्त आजार असलेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.



























































