30 वर्षांपासून फरार सराईत गुन्हेगाराला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रॉबरी, जबरी चोरी, मारामारी असे अनेक गुन्हे करणारा रेकॉर्डवरचा आरोपी 1989 पासून फरार झाला होता. विशेष सत्र न्यायालयाने त्याच्या विरोधात अटक वॉरंट काढले पण तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अखेर गुन्हे शाखा युनिट-9 ने ओळख बदलून पालघरमध्ये लपून राहणाऱया या गुन्हेगाराला 30 वर्षांनंतर शोधून काढला.

बॅलडिन फ्रान्सिस मिरांडा असे या फरार आरोपीचे नाव आहे. मिरांडाने 80 च्या दशकात मुंबई शहरामध्ये अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले होते. 1989 मध्ये मिरांडा मुंबईतून पसार झाला तेव्हापासून तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही. सत्र न्यायालय तसेच महानगर दंडाधिकारी न्यायालयाने त्याच्या विरोधात वेगवेगळ्या गुह्यांत अटक वॉरंट जारी केले होते. याची गंभीर दखल घेऊन युनिट-9 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय जाधव, अंमलदार कोळी, राऊत, लोखंडे, गवते हे पथक मिरांडाचा कसून शोध घेत होते. पोलिसांनी त्याच्या वांद्रय़ाच्या खेरनगर येथील राहत्या घरी जाऊन शोधण्याचा प्रयत्न केला पण तो त्याचे घर कधीच विकून गेल्याचे निष्पन्न झाले. दीड महिना शोधाशोध केल्यानंतर मिरांडा हा नालासोपारा येथे दीपसागर कॉम्प्लेक्समध्ये राहत असल्याची पक्की खबर अंमलदार लोखंडे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने नालासोपारा गाठून 30 वर्षे फरार असलेल्या मिरांडाला पकडून आणले.