
मुंबईबाहेरच्या क्षेत्रात झोपडपट्टय़ांमध्ये वर्षानुवर्षे राहणाऱ्या गोरगरीबांना हक्काचे पक्के घर मिळावे यासाठी राज्य सरकारने गुरुवारी महत्त्वाची घोषणा केली. महामुंबईच्या क्षेत्रातही (एमएमआर) झोपड्यांच्या जागी सुसज्ज इमारती उभारण्यात येणार असून तेथे मुंबईच्या धर्तीवर एसआरए योजना लागू करण्यात येणार आहे. त्यासाठी एसआरएचे स्वतंत्र प्राधिकरणच निर्माण केले जाणार आहे. त्याचा लाभ ठाणे, कल्याण-डोंबिवली, बदलापूर, मीरा-भाईंदर, पालघरपासून ते थेट रायगडातील पेण-अलिबागपर्यंतच्या लाखो, करोडो झोपडपट्टीवासीयांना होणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज ठाण्यातील क्लस्टरचा शुभारंभ करण्यात आला. गेली अनेक वर्षे धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱया लाखो ठाणेकरांच्या घरांचे स्वप्न क्लस्टरच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकारणार आहे. यानिमित्ताने डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृहात झालेल्या एका शानदार सोहळ्यात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसआरएचीदेखील घोषणा केली. त्यामुळे मुंबईतील झोपडपट्टीवासीयांना झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतून जसे हक्काचे मोठे पक्के घर मिळत आहे त्याच धर्तीवर मुंबईबाहेरील एमएमआर क्षेत्रातील झोपडय़ांचा एसआरएच्या माध्यमातून पुनर्विकास केला जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या योजनांच्या मंजुरीसाठी मुंबईपर्यंत खेटे घालण्याची गरज उरणार नाही, तर महामुंबईसाठीचे स्वतंत्र प्राधिकरणच यावर निर्णय घेऊन अंमलबजावणी करणार आहे.
एमएमआर क्षेत्रातही क्लस्टर
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 40 हजार घरे देण्याचे स्वप्न पाहिले होते. आता महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने सरकारच्या माध्यमातून प्रत्यक्षात आम्ही हे स्वप्नदेखील साकार करू, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, झोपडपट्टय़ांमध्ये राहणाऱया लाखो गोरगरीबांच्या जीवन-मरणाचा प्रश्न असून नगरविकास व गृहनिर्माण हे दोन्ही विभाग ठाण्यातील दोन मंत्र्यांकडेच आहेत. त्यामुळे ठाणे व एमएमआरसह संपूर्ण महाराष्ट्राचा विकास निश्चित होईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. दरम्यान, एमएमआर क्षेत्रातील धोकादायक इमारतींचादेखील पुनर्विकास क्लस्टरच्याच माध्यमातून करण्यात येईल, अशी घोषणा नगरविकासमंत्र्यांनी केली.






























































