मुंबईतील शाळा बंदच, दहावीचा परीक्षा अर्ज भरणार कसा? आजपासून वेबसाइट सुरू; मुख्याध्यापकांमध्ये नाराजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

मार्च महिन्यात होणाऱया दहावीच्या परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया उद्या 23 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबई आणि परिसरातील शाळा बंदच असल्याने परीक्षा अर्ज भरायचा कसा, असा प्रश्न शाळांसमोर आहे. मुंबई मुख्याध्यापक संघटनेने याविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचे ऑनलाईन परीक्षा अर्ज भरण्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 23 डिसेंबर ते 11 जानेवारी या कालावधीत नियमित विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरायचे असून 12 ते 25 जानेवारी या कालावधीत पुनर्परीक्षार्थी, श्रेणीसुधार योजनेतील, तुरळक विषय घेऊन परीक्षेस बसलेले विद्यार्थी परीक्षा अर्ज करू शकतात. विद्यार्थ्यांना www.mahahsscboard.in या वेबसाईटवर अर्ज भरायचा असून परीक्षा अर्ज शाळेतूनच भरावा, अशी सूचना शिक्षण मंडळाने दिल्या आहेत. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ज्या विभागातील शाळा अद्यापही बंदच आहेत तेथील मुख्याध्यापकांना परीक्षा अर्ज कसा आणि कधी भरून घ्यायचा, असा प्रश्न पडला आहे.

बरेच विद्यार्थी आजही मुंबईबाहेरच

मुंबई तसेच शहरी भागात अजूनही शाळा वा दहावीचे वर्ग ऑनलाइन सुरू आहेत. शाळा प्रत्यक्षात सुरू कधी होतील याबाबत संभ्रमावस्था आहे, अशा परिस्थितीत अर्ज कसे भरायचे याविषयी शिक्षण मंडळाने कोणत्याही सूचना दिल्या नसल्याचे मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी सांगितले. दहावीचे बरेचसे विद्यार्थी मुंबईबाहेर आहेत. अशावेळी घाईघाईने ही प्रक्रिया सुरू करणे अन्यायकारक आहे. अर्ज भरताना पह्टो, आधारकार्ड तसेच विद्यार्थी स्वाक्षरी लागते, तसेच परीक्षा शुल्कदेखील भरावे लागते. मुळात परीक्षा प्रवेश अर्ज ऑनलाइन भरले जात असल्याने व तत्काळ हॉलतिकीट जनरेट होत असल्याने जानेवारी महिन्यातील दुसऱया पंधरवडय़ात ही प्रक्रिया सुरू करायला हवी होती, असेही रेडीज यांनी स्पष्ट केले.

दहावी, बारावी फेरपरीक्षेचा आज निकाल

नोव्हेंबरमध्ये घेण्यात आलेल्या दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेचा ऑनलाइन निकाल उद्या 23 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना www.mahresult.nic.in वर निकाल पाहता येईल तसेच सदर माहितीची प्रिंटदेखील काढता येईल. ऑनलाइन निकालानंतर लगेचच गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांची छायाप्रत, पूनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. त्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांनी http://verification.mh-ssc.ac.in या तर बारावीच्या विद्यार्थ्यांनी http://verification.mh-hsc.ac.in या वेबसाईटवर अर्ज करायचा आहे.