शाहूनगर दुहेरी हत्याकांडप्रकरणी आरोपपत्र दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

माहीम पूर्वेकडील शाहूनगर येथे डायमंड अपार्टमेंटमध्ये घडलेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणाचे आरोपपत्र शाहूनगर पोलिसांनी कोर्टात दाखल केले. हे हत्याकांड पतीने त्याच्या प्रेयसीच्या मदतीने केले होते.

इलियास सय्यद हा डायमंड अपार्टमेंटमध्ये त्याची पत्नी तेहसीन (35), एक मोठी मुलगी आणि दुसरी अडीच वर्षांची मुलगी आलिया यांच्यासोबत राहत होता. इलियास आणि आफरीन बानू फैयाज सय्यद यांच्यात विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. या दोघांनी मिळून तेहसीन आणि आलिया यांच्या हत्येचा कट रचला होता. त्यानुसार आधी इलियासने दोघींचा गळा चिरून हत्या केली. त्यानंतर आफरीनने घरात जाऊन दोघींचा मृतदेह तेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी शाहूनगर पोलिसांनी इलियास आणि आफरीन यांना हत्येच्या गुह्यात अटक केली होती. या हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी 227 पानांचे आरोपपत्र कोर्टात हजर केले आहे. त्यात 49 साक्षीदारांचे जबाब नोंदवलेले आहेत. साक्षीदारांमध्ये त्या दिवशी आफरीनला टॅक्सीमधून डायमंड अपार्टमेंटजवळ घेऊन येणारा आणि तेथून घेऊन पुन्हा तिला पाच उद्यान येथे सोडणारा टॅक्सीचालक अफ्रोजुद्दीन सिद्दिकी हा मुख्य साक्षीदार आहे.
याशिवाय पोलिसांनी आफरीन इमारतीमध्ये जाताना व इमारतीमधून बाहेर पडतानाचे सीसीटीव्ही फुटेज, मृतदेह जाळताना रक्तावरून पाय घसरून पडल्यामुळे रक्तात माखलेले तिचे कपडे, गुह्यात वापरलेले दोघांचे मोबाईल, आफरीनच्या पायाचे ठसे, दोघींचा गळा चिरण्यासाठी वापरलेला चाकू आदी सबळ पुरावे पोलिसांनी जमा केले आहेत.

…म्हणून आफरीन घाबरली

इलियासने दोघींची हत्या केल्यानंतर तो घरातून निघून गेला. त्यानंतर आफरीन घरात गेली होती. ती सिलिंडरचा पाइप काढून आग लावणार होती, पण असे केले तर आगीचा भडका उडेल आणि सर्वांना लगेच माहीत पडेल. कदाचित त्यात आपणही होरपळले जाऊ अशी भीती वाटली म्हणून सिलिंडरचा पाइप न काढता तेल टाकून दोघींचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचे आफरीनने आपल्या कबुलीजबाबात म्हटले आहे.