
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-3 प्रकल्पाच्या भुयारीकरणाचा 35 वा टप्पा आज यशस्वीरीत्या पूर्ण झाला. सिद्धिविनायक ते दादर दरम्यानचे 1.12 किलोमीटर लांबीचे भुयारीकरण पूर्ण झाले. याबरोबरच मेट्रो-3 च्या पॅकेज-4 चे 10.96 किलोमीटरचे भुयारीकरण तीन टनेल बोअरिंग मशीन्सद्वारे पूर्ण झाले.
मेट्रो-3 च्या एकूण सातपैकी चार पॅकेजमधील भुयारीकरण आतापर्यंत शंभर टक्के पूर्ण झाले आहे. वाहनांनी सतत गजबजलेले वर्दळीचे रस्ते आणि विविध धार्मिक स्थळे पॅकेज-4 च्या परिसरात होती. त्यामुळे तेथील भुयारीकरण हे आव्हानात्मक होते. या पॅकेजमध्ये दादर, सिद्धिविनायक, शीतलादेवी ही स्थानके येतात. मुंबईतील एक प्रमुख केंद्र असलेले दादर या भुयारी मेट्रोने जोडले गेल्याने मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर होऊ शकेल असा विश्वास मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देओल यांनी व्यक्त केला.
7 जुलै 2020 रोजी मेट्रोच्या भुयारीकरणाच्या 35 व्या टप्प्याचे काम सुरू करण्यात आले होते. कृष्णा-1 या टीबीएम मशीनद्वारे ते करण्यात आले. सिद्धिविनायक ते दादर अशा या डाऊनलाइन भुयारीकरणासाठी 805 सिमेंट रिंग्सचा वापर करण्यात आला. दादर मेट्रो स्थानकाचेही आतापर्यंत 42 टक्के काम पूर्ण झाले आहे. पॅकेज-4 मध्ये भुयारीकरणाचे अप लाइन आणि डाऊन लाइन असे आठ टप्पे पूर्ण करण्यात आले आहेत. त्यात नयानगर ते धारावी, नयानगर ते दादर, सिद्धिविनायक ते दादर आणि सिद्धिविनायक ते वरळी या टप्प्यांचा समावेश आहे.



























































