
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून वारंवार हिंदुस्थानला टॅरिफ वाढवण्याची दिली जाणारी धमकी आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने आज रेपो रेट जैसे थे ठेवल्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 166 अंकांनी घसरून 80,543 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 75 अंकांनी घसरून 24,574 अंकांवर बंद झाला आहे. शेअर बाजारात घसरण झाल्यामुळे याचा जबरदस्त फटका गुंतवणूकदारांना बसला असून त्यांचे तब्बल 3 लाख कोटी रुपये स्वाहा झाले आहेत.
बीएसई सेन्सेक्समधील 30पैकी 19 शेअर्समध्ये घसरण झाली. यामध्ये आयसीआयसीआय बँक, टायटन, कोटक बँक, टाटा मोटर्स, पॉवर ग्रीड, आयटीसी, टाटा स्टील, बजाज फिनसर्व, टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल टेक्नोलॉजीज, सनफार्मा, एलटी, एचसीएलटेक या कंपन्यांच्या समावेश आहे. तर एशियन पेंट, महिंद्रा अँड महिंद्रा, भारत इलेक्ट्रॉनिक्स, ट्रेंट आणि अदानी पोर्टस्च्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे.
बीएसईमधील लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅपिटलायझेशन आज घसरून 445.08 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले. याचाच अर्थ कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 2.88 लाख कोटी रुपयांची घसरण झाली. गुंतवणूकदारांना जबरदस्त फटका बसला असून त्यांच्या संपत्तीतील 2.88 लाख कोटी रुपये बुडाले आहेत.