मुंबईच्या रस्त्यावरील ‘बत्ती गूल’ होताच ‘लायटर’ धावत येणार

904

मुंबईतील रस्त्यांवर दिवे फ्यूज होताच आता स्थानिक लोकप्रतिनिधींपासून वॉर्ड ऑफिस गाठण्याची गरज राहणार नाही. कारण बेस्ट समितीने ऑटोमेटेड स्ट्रीट लाइटिंग मॅनेजमेंट सिस्टीम (एएसएमएस) योजनेला मंजुरी दिली आहे. त्यामुळे तुमच्या रस्त्यावरील दिवा बंद होताच जीपीएस तंत्राच्या मदतीने लागलीच या कॉलसेंटरमधून बेस्टच्या स्ट्रीट लाइटिंग डिव्हिजनच्या ‘लायटर’ना मोबाईलवर मॅसेज जाणार आहे. त्यामुळे मुंबईतील 40 हजार दिव्यांच्या व्यवस्थापनासाठी आधुनिक कॉल सेंटर उभारले जाणार असून बेस्टच्या दुरुस्ती पथकांना तातडीने संदेश जाणार असल्याने मुंबईकरांना आता त्यासाठी पायपीट करावी लागणार नाही.

बेस्ट समितीने रस्त्यांवरील दिव्याच्या खांबांचे व्यवस्थापन सांभाळण्यासाठी पायलट प्रोजेक्ट म्हणून ‘एएसएमएस’ यंत्रणेला गुरुवारच्या बैठकीत मंजुरी दिली. सात वर्षांच्या कालावधीसाठी 462 मार्गप्रकाश स्तंभाकरिता (एसएलपीस्) देखभालीसह हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचा पुरवठा करणे आणि संचमांडणी करणे यासाठी 4 कोटी 88 लाखांचे कंत्राट ओएचएम एनर्जी मॅनेजमेंट सिस्टीम्स प्रा. लि. दिले आहे.

यावर अशा प्रकारचे कंत्राट यापूर्वी देताना त्रुटी राहिल्याने बेस्टवर नामुष्की ओढवली होती. मुळात अशा प्रकारे रस्त्यावरील दिवा बंद असल्याचे कळल्यानंतर त्याच्या दुरुस्तीकरिता आपली बेस्टची यंत्रणा भक्कम आहे का, हे दिवे दुरुस्ती करणाऱया स्ट्रीट लाइट डिपार्टमेंटच्या ‘लायटर’ची पदे भरली जात आहेत का असा सवाल सदस्य सुनील गणाचार्य यांनी केला. रस्त्यावरील दिवा गेला तर नगरसेवकांकडे नागरिक तक्रारी करतात. आधीचा प्रकल्प का अपयशी झाला याची माहिती पटलावर ठेवा असे शिवसेना सदस्य आशीष चेंबूरकर यांनी सांगितले.

सर्किटमधील फॉल्ट ‘एसएमएस’वर कळणार

सर्किटमधील फॉल्ट शोधण्यास वेळ लागतो. या जीपीएसवर आधारित अत्याधुनिक यंत्रणेमुळे मोबाईलवर नेमका बिघाड कुठे झाला आहे ते समजणार असून त्यावर नियंत्रण कक्षातून योग्य आणि झटपट निर्णय घेता येणार असल्याचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी सांगितले. त्यानंतर या प्रकल्पाची माहिती पटलावर ठेवण्याचे आदेश देत अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी हा प्रस्ताव मंजूर केल्याचे जाहीर केले.

आपली प्रतिक्रिया द्या