मिंधेंच्या रस्ता घोटाळ्यामुळे मुंबईचे हाल, BMC ने आपत्ती व्यवस्थापन कक्षात भेट देणाऱ्यांचे फोटो नाही तर, खरी माहिती द्यावी – आदित्य ठाकरे

मुंबईवर गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत असून, हवामान खात्याने (IMD) पावसाबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) कामावर ताशेरे ओढले आहेत. त्यांनी सोमवारी X वर एक पोस्ट करून बीएमसीकडून पावसाशी संबंधित माहिती जाहीर करण्याची मागणी केली असून, प्रशासनाच्या जबाबदारीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

X वर पोस्ट करत आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, “गेल्या दोन दिवसांतील पावसाच्या सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर बीएमसीने, मुंबईत किती पंप कार्यान्वित करण्यात आले? किती पंपिंग स्टेशन पूर्ण क्षमतेने काम करत होते? या वर्षी किती नवीन पूरग्रस्त ठिकाणे नोंदवली गेली आणि का? याची माहिती जाहीर करावी.”

आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, “अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांनी आपापल्या कार्यक्षेत्रात रस्त्यांवर उतरून परिस्थितीवर लक्ष ठेवावे. गेल्या तीन वर्षांपासून बीएमसीवर थेट राज्य सरकारचे नियंत्रण आहे, कारण महापालिका निवडणुका झाल्या नाहीत. निवडणुकीअभावी कोणतेही निवडून आलेले प्रतिनिधी नाहीत. परंतु निवडणुकीअभावी जबाबदारीचा अभाव देखील आहे.”

आदित्य ठाकरे यांनी मे महिन्यातील पावसात अंधेरी सबवे आणि सिप्झ परिसरात अवघ्या दहा मिनिटांच्या पावसात पाणी साचल्याची आठवण करून दिली. यामागे रस्त्यांची खराब स्थिती असून, ही स्थिती ‘फेकनाथ मिंधे’ यांच्या रस्ता दुरुस्ती घोटाळ्यामुळे निर्माण झाल्याचे ते म्हणाले आहेत.