
गेले काही दिवस भट्टी तापल्यासारखी होरपळ सोसणाऱया मुंबई-ठाणे शहरांत पुढील आठवडाभर उष्णतेची लाट धडकणार आहे. शनिवारी अचानक 38.9 अंशांवर झेपावलेला पारा रेकॉर्डब्रेक उसळीचा धडाका सुरू ठेवून मुंबईकरांना दिवस-रात्र घाम फोडणार आहे. त्यामुळे मुंबईकर, ठाणेकरांनी आरोग्याची काळजी घ्यावी, दुपारी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असा सावधगिरीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्याच्या ग्रामीण भागातही उष्णतेचा कहर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मार्च महिना सुरू झाल्यापासून मुंबई, ठाणे आणि पालघर जिह्यात तापमानवाढ सुरू झाली आहे. त्यातच अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला. त्यामुळे वातावरणाचे गणित पूर्णतः बिघडले. एकीकडे पारा 35-36 अंशांच्या पातळीवर झेपावला, त्याचवेळी हवेतील आर्द्रतेचा टक्काही वाढला. येत्या तीन-चार दिवसांत तर पारा 38-39 अंशांच्याही पुढे उसळी घेईल. मुंबई आणि ठाणे शहरांत उष्णतेची लाट धडकेल आणि तापमान मागील 10 वर्षांतील सर्व विक्रम मोडीत काढेल, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे. शनिवारी सांताक्रूझमध्ये कमाल 38.9 अंश असे यंदाच्या हंगामातील विक्रमी तापमान नोंद झाले. तसेच कुलाब्यात 37 अंशांवर पारा गेला. तापमानात अचानक सरासरीपेक्षा 6 अंशांची मोठी वाढ झाली. किमान तापमानही 2 अंशांनी वाढले. मुंबईप्रमाणेच ठाण्याचीही होरपळ वाढणार आहे. जिह्याच्या ग्रामीण भागासह ठाणे शहराचे तापमान पुढचे आठवडाभर 37 अंशांच्या घरात राहणार आहे. उष्णतेचा हा कहर आरोग्यावर विपरीत परिणाम करेल, नागरिकांची भयंकर दमछाक करेल. उन्हातली भिरभिर टाळण्यासाठी दुपारी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नका, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
हा ऋतू बदलाचा परिणाम आहे. आपण ज्यावेळी हिवाळ्यामधून उन्हाळ्यामध्ये प्रवेश करतो त्यावेळी वाऱयाची दिशा स्थिर होण्यास वेळ लागतो. पूर्वेकडून येणारे वारे जोरदार वाहू लागतात. त्यामुळे काही वर्षांत अचानक अशी मोठी तापमानवाढ होते.
कृष्णानंद होसाळीकर, हवामान शास्त्रज्ञ
मुंबई @ 38.9 अंश;
राज्यात सर्वाधिक
शनिवारी मुंबईत नोंद झालेले 38.9 अंश तापमान हे संपूर्ण राज्यात सर्वाधिक ठरले. नागपूर, नंदुरबार, यवतमाळ, चंद्रपूरपेक्षाही उच्चांकी पातळीवर मुंबईचा पारा गेला. राज्यात यवतमाळ-35, नागपूर(सोनेगाव विमानतळ)-35.9, चंद्रपूर- 36.6, अकोला-37.3, रत्नागिरी- 36.4, पुणे – 34.6, नाशिक – 33.2 अशी तापमानाची नोंद झाली. ग्रामीण भागापेक्षाही मुंबई-ठाण्याचा पारा उच्चांकी पातळीवर भिरभिरु लागला आहे.


























































