
मुंबई ते ठाणे प्रवास आता सिग्नल फ्री होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पूर्व द्रुतगती महामार्गावरील छेडानगर जंक्शन सुधारणा प्रकल्पातील मानखुर्द ते ठाणे दिशेकडील छेडानगर जंक्शन येथील उड्डाणपुलाचा तसेच सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड विस्तार प्रकल्पातील कपाडिया नगर ते वाकोला जंक्शन या उन्नत मार्गाचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला.
नवी मुंबई-ठाणे प्रवासही सिग्नल फ्री
मानखुर्दवरून ठाण्याकडे जाणाऱ्या 1.23 कि.मी. लांबीच्या दोन पदरी उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यात आले. या उड्डाणपुलामुळे मानखुर्दवरून ठाणे दिशेकडील वाहतूक सिग्नलमुक्त होईल. तसेच नवी मुंबईवरून ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरळीत होऊन नवी मुंबईवरून येणारी वाहने आता विनाव्यत्यय ठाण्याच्या दिशेने प्रवास करतील. सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता आणि पूर्व द्रुतगती मार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई उपनगरांतील तसेच नवी मुंबईवरून मुंबई-ठाण्याकडे जाणाऱया वाहतुकीमुळे घाटकोपर येथील छेडानगर जंक्शनवर वाहतूककोंडी होत असे. ही वाहतूककोंडी कमी करण्यासाठी एमएमआरडीएने छेडानगर जंक्शन सुधारणा प्रकल्प हाती घेतला आहे. त्याअंतर्गत एकूण तीन उड्डाणपूल आणि एक भुयारी मार्ग बांधण्यात येत आहेत. या प्रकल्पातील सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्त्याला जोडणारा उड्डाणपूल हा वाहतुकीसाठी खुला केला आहे.


























































