
मुंबई आणि महाराष्ट्राची लूट रोखायची असेल, आपल्या पायाखालची जमीन उद्योगपतींच्या घशात घालायची नसेल तर मशालीशिवाय पर्याय नाही, भ्रष्टाचार आणि फसवणूक थांबवण्यासाठी मशालीलाच मतदान करा, असे आवाहन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज तमाम मराठीजनांना केले.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आदित्य ठाकरे यांनी आज प्रभाग क्र. 82मधील शिवसेना उमेदवार पायल संदीप नाईक तसेच सांताक्रूझच्या प्रभाग क्र. 71मधील उमेदवार श्रद्धा प्रभू यांच्या प्रचार कार्यालयाला भेट दिली. याशिवाय आंबोली येथील प्रभाग क्र. 64, 65 आणि 66मधील शिवसेना उमेदवारांसाठी आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा झाली. भारतीय जनता पक्ष लोकांना नको त्या विषयांत गुंतवून ठेवत आहे. दहीहंडी, हिंदू-मुस्लीम वाद, बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा अशा विषयांचा वापर करून जनतेचे लक्ष मूळ प्रश्नांपासून दूर ठेवले जात आहे. हे विषय पुढे करून अदानीसारख्या उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठी मुंबई आणि महाराष्ट्राची लूट सुरू आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
महापौर आपलाच होईल
मुंबईची ओळख अबाधित राहिली पाहिजे. मुंबईचे अदानीस्तान होता कामा नये. मराठी माणसाने एकजूट कायम ठेवली तर मुंबईत आपलाच महापौर निवडून येण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. याप्रसंगी शिवसेना नेते, आमदार अॅड. अनिल परब व अन्य पदाधिकारी, शाखाप्रमुख उपस्थित होते.
शिवसैनिकांनो, भाजपच्या भ्रष्टाचाराचा बुरखा फाडा
शिवसैनिकांनो, पुढील दोन दिवसांत घरोघरी जाऊन जनतेशी संवाद साधा आणि भाजपच्या भ्रष्टाचाराचा, खोटेपणाचा बुरखा फाडा. कोणत्याही भुलथापांना बळी पडू नका. गेल्या 25 वर्षांत शिवसेनेने जात-पात, धर्म न पाहता मुंबईची सेवा केल्याचा इतिहास जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी केले. शिवतीर्थावरील सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अदानींच्या विस्ताराबाबत केलेल्या सादरीकरणाचा व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवून जनजागृती करा, असेही ते म्हणाले.





























































