अर्णब गोस्वामीने रेटिंगच्या बदल्यात 12 हजार डॉलर्स, 40 लाख रुपये दिले! पार्थो दासगुप्ताची कबुली

टीआरपी घोटाळय़ातील दस्तऐवजातून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यापाठोपाठ ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांनी रिपब्लिक वाहिनीच्या बाजूने टीआरपी रेटिंगमध्ये फेरफार करण्यासाठी या वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामीकडून 12 हजार डॉलर्स मिळाले. याशिवाय तीन वर्षांत एकूण 40 लाख रुपये मिळाले होते, अशी धक्कादायक कबुली दासगुप्ता यांनी पोलिसांच्या जबाबात दिली आहे.

टीआरपी घोटाळाप्रकरणी मुंबई पोलिसांकडून 11 जानेवारीला 3600 पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये ‘बार्प’च्या फॉरेन्सिक ऑडिट रिर्पोट बरोबरच ‘बार्क’चे काही माजी कर्मचारी आणि केबल ऑपरेटरसह 59 जणांच्या निवेदनांचा समावेश आहे. याशिवाय गोस्वामी आणि गुप्ता यांच्यात झालेल्या व्हॉटस्अॅप संवादाची माहिती देखील यामध्ये आहे.

टीआरपी घोटाळा प्रकरणी बार्कशी संबंधित दासगुप्ता, रोमील रामगढिया आणि रिपब्लिक मिडियाचे विकास खनचंदानी यांच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले. यासंदर्भात 27 डिसेंबर 2020 रोजी दोन साक्षीदारांच्या उपस्थितीत पोलिसांनी (क्राईम इंटेलिजन्स युनिट) दासगुप्ता यांचा जबाब नोंदवून घेतला, यामध्ये टीआरपी फेरफारसाठी गोस्वामीकडून लाखो रुपये मिळाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

रेटींगसाठी बार्पच्या अधिकाऱयांशी हातमिळवणी

रिपब्लिक टिव्ही व अन्य काही वृत्तवाहीन्यांनी टिआरपी रेटींगमध्ये फेरफार करण्यासाठी ‘बार्क’च्या अधिकाऱयांशी कशी हातमिळवणी केली होती. याबाबतची विस्तृत माहिती पुरवणी आरोपपत्रात देण्यात आली आहे. आरोपपत्रात समावेश असलेल्या बार्पच्या अहवालात काही वाहिन्यांच रेटींग पूर्वीच ठरल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. रिपब्लिकच्या साप्ताहिक क्रमवारीला चालना देण्यासाठी टाईम्स नाऊच्या दर्शनावर कथितपणे दडपशाही केल्याचा उल्लेख या अहवालात करण्यात आला आहे.

दासगुप्ता आणि अर्णबने केलं होतं एकत्र काम

मी अर्णब गोस्वामीला 2004 पासून ओळखतो. टाईम्स नाऊ मध्ये आम्ही सोबत काम करत होतो. मी बार्कचा सीईओ म्हणून 2013 मध्ये काम सुरू केले होते आणि अर्णब गोस्वामीने 2017 मध्ये रिपब्लिक वाहिनी सुरू केली. त्या अगोदर अनेकदा त्याने वाहिनीचं कामकाज आणि टीआरपी रेटींगच्या अनुषंगाने चर्चा करून मदत मागितली होती, अशी कबुली दासगुप्ता यांनी दिली आहे.

दासगुप्तांच्या पोलीस जबाबात काय?

  • टीआरपी यंत्रणा कशी कार्य करते हे मला माहित आहे हे गोस्वामींना चांगलेच माहित होते.
  • टीआरपी रेटिंगमध्ये फेरफार करण्यासाठी मी माझ्या टीमबरोबर काम केले ज्यामुळे रिपब्लिक टीव्हीला क्रमांक 1 रेटिंग मिळाली.
  • रिपब्लिक टीव्हीला चांगल रेटींग मिळाव यासाठी 2017 पासून 2019 पर्यंत मदत केली.
  • 2017 मध्ये अर्णब गोस्वामीसोबत सेंट रेजिस हॉटेल, लोअर परेल येथे भेट झाली. त्यावेळेस त्यांनी मला फ्रान्स व स्वित्झर्लंडच्या कौटुंबिक सहलीसाठी 6 हजार डॉलर रोख दिले.
  • 2019 मध्येदेखील स्विडन आणि डेन्मार्प येथील कौटुंबिक सहलीसाठी देखील त्यांनी 6000 डॉलर दिले होते.
  • 2017 मध्ये आयटीसी, परेल येथे झालेल्या भेटीच्यावेळी गोस्वामीने मला 20 लाख रुपये दिले. 2018 व 2019 मध्ये त्यांनी मला प्रत्येकी 10 लाख रुपये दिले होते.
आपली प्रतिक्रिया द्या