मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाईन आणि ऑनलाईनही, नियोजित वेळापत्रकात कोणताही बदल नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा 19 एप्रिलपासून सुरळीत सुरू झाल्या आहेत. ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने या परीक्षा होत असून परीक्षेच्या नियोजित वेळापत्रकात कोणताही बदल झालेला नाही. विद्यापीठाच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार पार पडतील, असे परीक्षा व मूल्यमापन विभागाने स्पष्ट केले आहे. 

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील कुलगुरूंसोबत झालेल्या बैठकीनंतर विविध विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचे जाहीर केले होते. तसेच मे महिन्यात होणाऱया परीक्षा 1 जून ते 15 जुलैदरम्यान घेण्यात येणार असल्याचे सांगितले. या निर्णयामुळे मुंबई विद्यापीठाशी संलग्नित विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. ऑनलाईन पद्धतीने होणाऱया परीक्षा ऑफलाईन होणार का, जूनपर्यंत परीक्षा लांबल्यास पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे काय, निकाल कधीपर्यंत मिळणार, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाले.

मात्र आता मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर केला आहे. विद्यापीठातील उन्हाळी सत्राच्या विविध परीक्षा 19 एप्रिलपासून सुरू असून काही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या आहेत, तर काही परीक्षा ऑफलाईन झाल्या आहेत. अद्याप परीक्षा सुरू असून विद्यापीठाने ठरविल्याप्रमाणे नियोजित वेळापत्रकानुसार आणि पद्धतीने या परीक्षा पार पडतील. त्यात सध्या तरी कोणताही बदल केला नसल्याचे पाटील म्हणाले.

अशा होत आहेत परीक्षा ऑफलाईन

  • पदवीच्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या सत्र-2 नियमित व बॅकलॉग
  • कला, वाणिज्य व विज्ञान पदव्युत्तर सत्र-2 व 4 नियमित व बॅकलॉग
  • व्यवस्थापन, तंत्रज्ञान व  आंतर-विद्याशाखा व्यवस्थापनशास्त्र्ा शाखेच्या सत्र 1 ते 4 नियमित व बॅकलॉग परीक्षा
  • अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर व एमसीए या वर्गाच्या सर्व परीक्षा
  • शिक्षणशास्त्र्ा पदवी परीक्षा सत्र 2 व 4
  • आंतर-विद्या शाखेतील उर्वरित परीक्षा
  • विधी शाखेच्या सर्व परीक्षा ऑनलाईन
  • पदवीच्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या सत्र 1, 3 व 5 बॅकलॉग तसेच सत्र-4ची नियमित व बॅकलॉग
  • कला, वाणिज्य व विज्ञान पदव्युत्तर परीक्षा सत्र 1 व 3 बॅकलॉग
  • शिक्षणशास्त्र्ा पदवी परीक्षा सत्र 1 व 3 बॅकलॉग
  • व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑफलाईन तर पारंपरिक कला, वाणिज्य, विज्ञान व स्वयं अर्थसहाय्यीत अभ्यासक्रमातील सत्र-6च्या (चॉईस बेस) नियमित व बॅकलॉगच्या परीक्षा या ऑनलाईन तर प्रात्यक्षिक परीक्षा ऑफलाईन होत आहेत.
  • सत्र-6च्या परीक्षा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या असतात. या परीक्षांचा निकालही वेळेवर जाहीर करणे आवश्यक आहे. या निकालावर विद्यार्थ्यांचे पुढील उच्च शिक्षण तसेच नोकरी अवलंबून असते. त्यामुळे नियमित व बॅकलॉगच्या परीक्षा ऑनलाईन होत आहेत.
  • सत्र-6च्या परीक्षेतील प्रात्यक्षिक परीक्षा मात्र ऑफलाईन सुरू आहेत. ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणाऱया कला, वाणिज्य व विज्ञान पदवी व पदव्युत्तर परीक्षा या 50 टक्के बहुपर्यायी प्रश्न व 50 टक्के वर्णनात्मक प्रश्न असे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आहे.