प्रथम वर्ष प्रवेशासाठी आज 1 वाजेपर्यंतच अर्ज करा

प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांसाठी मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी करणे बंधनकारक आहे. सदर प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी न केल्यामुळे प्रवेश यादीत नाव येऊनही संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेण्यास विद्यार्थ्यांना अडचण निर्माण होत होती. हेच जाणून विद्यापीठाने प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी करण्याची पुन्हा संधी दिली होती. यानुसार विद्यार्थ्यांना 10 जून रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत https://mu.ac.in/admission या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी करण्याची शेवटची संधी असणार आहे. त्यानंतर 11 जून रोजी सकाळी 11 वाजता चौथी प्रवेश यादी आणि 14 जून रोजी दुपारी 12 वाजता पाचवी प्रवेश यादीही संबंधित महाविद्यालयाच्या संकेतस्थळावरून जाहीर करण्यात येणार आहे.