मुंबई विद्यापीठाला लवकरच मिळणार कुलसचिव

मुंबई विद्यापीठाला लवकरच पूर्णवेळ कुलसचिव मिळणार आहे. विद्यापीठाने कुलसचिव नियुक्तीसाठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार आतापर्यंत सुमारे 18 जणांचे अर्ज आले असून त्यांची छाननी प्रक्रिया विद्यापीठाने सुरू केली आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत नवीन कुलसचिवांच्या मुलाखतीचा कार्यक्रमही जाहीर होण्याची शक्यता आहे. मुंबई विद्यापीठाला मागील वर्षभराहून अधिक काळ प्रभारी कुलसचिवांद्वारे आपला कारभार चालवावा लागत आहे. 4 वर्षांपूर्वी पूर्णवेळ कुलसचिव म्हणून नियुक्त झालेल्या सुधीर पुराणिक हे आजारपणामुळे नोव्हेंबर 2022 पासून रजेवर होते. त्यांचा कार्यभार काही महिन्यांसाठी उच्च शिक्षण विभागाचे विद्यमान प्रभारी संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्याकडे देण्यात आला होता. मात्र त्यांची प्रभारी संचालकपदी नियुक्ती झाल्यावर पुन्हा हे पद रिक्त राहिले. या पदाचा कार्यभार सुनील भिरूड यांच्यावर सोपविण्यात आला होता. दरम्यान, आता जाहिरातीनंतर 18 जणांच्या मुलाखती होऊन लवकरच मुंबई विद्यापीठाला पूर्णवेळ कुलसचिव मिळवा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.