
मुंबापुरीची भविष्यातील विजेची वाढती मागणी लक्षात घेता उरण येथे तब्बल 1000 मेगावॅट क्षमतेचा वायू वीज प्रकल्प उभारणार असल्याचे गुरुवारी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी स्पष्ट केले. त्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महानिर्मितीला दिले आहेत. तसेच सध्याच्या वायू वीज केंद्राची क्षमता वाढवण्याबाबत त्यांनी अधिकाऱयांशी चर्चा केली.
मुंबईच्या खंडित झालेल्या वीज पुरवठय़ाच्या पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी उरण वायू वीज प्रकल्पाला भेट दिली. सध्याची मुंबईची कमाल मागणी 3500 मेगावॅट एवढी असून 2030 पर्यंत ती पाच हजार मेगावॅटपर्यंत वाढणार आहे.
सध्या मुंबई आणि परिसरातील वीज प्रकल्पातून मुंबईला 1300-1400 मेगावॅट वीज उपलब्ध होते. त्यामुळे मुंबई नजीकची वीज निर्मिती क्षमता वाढवण्यासाठी सध्याच्या उरण वीज प्रकल्पाच्या रिकाम्या जागेवर आणखी एक हजार मेगावॅटचा वायू वीज प्रकल्प दोन वर्षात उभारणे आवश्यक असल्याचे उर्जामंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महानिर्मितीला दिले आहेत. त्याचबरोबर सध्याच्या वीज प्रकल्पाची 672 मेगावॅट असलेली क्षमता काशी वाढवता येईल त्याबाबतही त्यांनी चर्चा केली.
गॅस टर्बाइनची पाहणी
उरणच्या वायू वीज केंद्राची क्षमता 672 मेगावॅट असली तरी चारपैकी दोन संच बंद आहेत. त्यामुळे येथून 280 मेगावॅटपर्यंत वीज निर्मिती होते. त्यापार्श्वभूमीवर ऊर्जामंत्र्यांनी वीज प्रकल्पाच्या गॅस टर्बाइनची पहाणी केली. तसेच प्रकल्पातील बिघाड टाळण्यासाठी तांत्रिक उणीवा दूर कराव्यात आशा सूचना दिल्या.



























































