
‘मी असेपर्यंत खुशाल गाई कापा, तुम्हाला कोणी मनाई करणार नाही’ असे खाटकांना बिनदिक्कत सांगणारे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात बुधवारी संतापाचा लाव्हा फुटला. रावसाहेब दानवे यांनी मतांसाठी माती खाल्ली अशा शब्दांत विश्व हिंदू परिषदेने रावसाहेब दानवे यांची हजामत केली. दानवे यांनी चार दिवसांत समस्त हिंदूंची माफी मागितली नाही तर त्यांच्या विरोधात देशभरात जोडे मार आंदोलनाचा वणवा पेटवणार असल्याचा इशाराही विश्व हिंदू परिषदेने दिला आहे.
भोकरदन विधानसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे यांनी आपले चिरंजीव संतोष दानवे यांच्या प्रचारार्थ 19 ऑक्टोबर रोजी कठोरा बाजार येथे मुसलमानांची सभा घेतली. या सभेत त्यांनी ‘मी असेपर्यंत खुशाल गाई कापा, तुम्हाला कोणीही मनाई करणार नाही’ असे गोहत्या कायद्याचा अवमान करणारे वक्तव्य केले. दानवेंच्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच हिंदुत्ववाद्यांच्या संतापाचा कडेलोट झाला.
विश्व हिंदू परिषदेचा एल्गार
बुधवारी विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱयांनी पत्रकार परिषद घेऊन हे विधान करणाऱया रावसाहेब दानवे यांचा धिक्कार केला. गोहत्या बंदी कायदा करण्यासाठी हिंदुत्ववाद्यांना कैक वर्षे लढा द्यावा लागला. केंद्रात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आल्यानंतर आमचे कित्येक वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले. मोदी सरकारने देशभरात गोहत्या बंदीचा कायदा लागू केला. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मंत्री म्हणून दानवे यांची जबाबदारी आहे, मात्र त्यांनीच या कायद्याला हरताळ फासण्याची विखारी भाषा केली. चार दिवसांत त्यांनी या विधानाबद्दल जाहीर माफी मागावी, नाहीतर त्यांच्या विरोधात देशभरात जोडेमार आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी विश्व हिंदू परिषदेने दिला. यावेळी प्रांत अध्यक्ष संजय बारगजे, प्रांत मंत्री अनंत पांडे, गोरक्षा प्रांत प्रमुख राजेश जैन उपस्थित होती.
लटपटलेल्या दानवेंचा फोन
मोदी सरकारने केलेल्या गोहत्या बंदी कायद्याच्या विरोधात घेतलेल्या जाहीर भूमिकेवरून हिंदुत्ववाद्यांनी झोडपताच लटपटलेल्या रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषद सुरू असतानाच विहिंपच्या पदाधिकाऱयांना फोन केला. कठोरा बाजार येथील जाहीर सभेचा व्हिडीओ छेडछाड करण्यात आला आहे. या प्रकरणाचा आपण मुळापासून छडा लावणार आहोत. त्यासाठी वेळ द्यावा अशी विनवणी त्यांनी केली. त्यावर विहिंपच्या पदाधिकाऱयांनी चार दिवसांची मुदत देतो, त्यात व्हिडीओत छेडछाड करण्यात आल्याचे सिद्ध करा, नसता समस्त हिंदूंची जाहीर माफी मागा असे स्पष्ट बजावले.
‘सामना’चे जाहीर अभिनंदन!
रावसाहेब दानवे यांनी मोदी सरकारने केलेल्या गोहत्या बंदी कायद्याच्या अब्रूचे धिंडवडे काढले. ‘सामना’ने समस्त हिंदूंचा अपमान करणारे हे वक्तव्य जगासमोर आणल्याबद्दल विश्व हिंदू परिषदेने ‘सामना’चे जाहीर अभिनंदन केले.
रावसाहेब दानवे यांची तक्रार
कठोरा बाजार येथील जाहीर सभेच्या व्हिडीओत छेडछाड करण्यात आली असून याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारी तक्रार रावसाहेब दानवे यांनी भोकरदन पोलीस ठाण्यात केली आहे.
























































