
सामना प्रतिनिधी। मुंबई
बोगस मतदार याद्यांबाबत मागील पाच वर्षांत अनेक वेळा तक्रार केली. या याद्या आधारशी जोडल्यास नक्कीच बोगस याद्यांची समस्या दूर होऊ शकेल. त्यामुळे या याद्या आधार कार्डशी जोडण्याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अंतिम आठवडा प्रस्तावावर अनेकांनी ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले. अजितदादांचे भाषण ऐकले असते तर जयंत पाटील, आव्हाडांनी हा मुद्दा मांडला नसता. अजितदादांनी पक्षाच्या शिबिरात सांगितले की, ईव्हीएमला दोष देऊ नका. त्यामध्ये काही नाही. ईव्हीएम 2004, 2009 मध्ये होते तेव्हाही मनमोहन सिंग निवडून आले. या आधी विधानसभा निवडणुकीत तीन राज्यांत काँगेस सरकार आले. एवढेच नव्हे तर आता सुप्रिया सुळेही निवडून आल्या. तुम्ही सत्य स्कीकारलं नाहीत तर तिथेच बसावं लागेल, असा टोला त्यांनी लगावला.
ईव्हीएम आयोगाच्या अखत्यारित
ईव्हीएम हा सभागृहाचा विषय नाही ते निवडणूक आयोगाच्या अखत्यारित येतो, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. याआधी बॅलेट पेपरवर आरोप झाले आहेत. आम्ही त्याविरोधात सुप्रीम कोर्टात गेलो. तेव्हा हरलो, पण कधीतरी पराभव मान्य करावा लागतोच असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावर जीतेंद्र आव्हाड यांनी मतदार याद्या आधार कार्डशी जोडल्यास बोगस याद्याचा घोळ होणार नाही, अशी सूचना केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी मतदायाद्या आधारकार्डला जोडण्यासाठी निवडणूक आयोगाला पत्र देऊ, असे सांगितले.
वरळीतील कोळीबांधवांना नुकसानभरपाई द्या!
मुंबईत ईस्टर्न एक्प्रेस, फ्री वे, उड्डाणपूल, मेट्रो-मोनोचे जाळे, कोस्टल रोड अशी विकासकामे सुरू आहेत. हा विकास करताना शहराचा मूळ नागरिक असणारे कोळी बांधव त्यांच्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कोस्टल रोडच्या ठिकाणी स्थानिक मच्छीमारांचा रोजगारावर परिणाम होणार असल्याने त्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी केली आहे. वरळीतील 200 ते 250 कोळी बांधवांचा उपजीविकेवर परिणाम होणार आहे. सरकारने याबाबतीत ज्याप्रमाणे न्हावा-शेवा, उरण येथील प्रकल्पबाधित स्थानिकांना नुकसानभरपाई दिली आहे त्याप्रमाणे वरळी येथील कोळी बांधवांना महापालिकेकडून नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे सुनील शिंदे यांनी केली.























































