पाणी जपून वापरा! आजपासून आठवडाभर मुंबईत 10 टक्के पाणीकपात

153

पिसे पंपिंग स्टेशन दुरुस्तीच्या कामासाठी 7 डिसेंबरपासून आठवडाभर संपूर्ण मुंबईत 10 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. त्यामुळे आवश्यक पाण्याचा साठा करून ठेवावा आणि पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेने मुंबईकरांना केले आहे.

पिसे पंपिंग स्टेशन दुरुस्तीसाठी पालिकेने 3 ते 9 डिसेंबरपर्यंत 10 टक्के पाणीकपात करण्याचा घेतला होता, मात्र ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन येणाऱ्या आठवडय़ात पाणीकपात केल्यास मुंबईत येणाऱ्या लाखो अनुयायांची गैरसोय होण्याची शक्यता होती. त्यामुळे ही पाणीकपात पुढे ढकला अशी मागणी अनेक संघटनांकडून करण्यात आली होती. त्यामुळे पाणीकपातीचा निर्णय पुढे ढकलून 7 ते 13 डिसेंबरदरम्यान पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर कैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात धरणांमधून दररोज 3958 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो, मात्र यातील तब्बल 27 टक्के पाणी गळती आणि चोरीमुळे वाया जाते. त्यामुळे पालिकेने पाण्याची गळती रोखणे, जलवाहिन्यांची दुरुस्ती आणि यंत्रणेमध्ये सुधारणा करण्याचे काम सुरू केले आहे. यानुसार पालिकेच्या माध्यमातून पिसे उदंचन केंद्रामधील न्यूमॅटिक गेट सिस्टीमची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या कामामुळे मुंबईच्या पाणीपुरवठय़ावर परिणाम होणार असल्यामुळे 7 ते 13 डिसेंबर या कालावधीत 10 टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या