खूशखबर! सातही तलाव क्षेत्रांत जोरदार पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई  

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया सातही तलाव क्षेत्रांत झालेल्या जोरदार पावसामुळे पाणीसाठय़ात चांगलीच वाढ झाली आहे. सध्या सातही तलाव क्षेत्रांत ५३१०८४ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला असून हे पाणी १३६ दिवसांसाठी म्हणजेच साडेचार महिन्यांसाठी पुरेल इतके आहे. येत्या काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केल्यामुळे लवकरच वर्षभराचा कोटा फुल होणार आहे.

मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा या सात तलावांमधून दररोज ३९०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. या ३९०० दशलक्ष लिटरमधून १५० दशलक्ष लिटर पाणी भिवंडी आणि ठाण्याला दिले जाते. मुंबईला ३१ ऑक्टोबरपासून पुढील वर्षभरासाठी सर्व तलावांत मिळून १४,४७,३६३ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे तलाव क्षेत्रात पडणारा पाऊस मुंबईकरांची तहान भागवणारा असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले असते.

वोह पाच दिन
९ जुलै
कोकण आणि गोवा, विदर्भ, दक्षिण छत्तीसगढ तेलंगणामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाच्या सरी कोसळतील. विदर्भ, दक्षिण छत्तीसगढ आणि तेलंगणामध्ये तसेच ओडिशा, गुजरात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटक आणि केरळची किनारपट्टी, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय, सिक्कीम, आंध्र प्रदेशची किनारपट्टी या ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

१० जुलै
मध्य प्रदेश, कोकण किनारपट्टी आणि गोव्यात अतिवृष्टीचा इशारा. मध्य प्रदेश पूर्व, गुजरात, मध्य महाराष्ट्र, तेलंगणा, दक्षिण कर्नाटक आणि केरळमधील काही भाग, अंदमान आणि निकोबार, आसाम, मेघालय, ओडिशा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थानचा पूर्व भाग, मराठवाडा, विदर्भ आणि छत्तीसगढमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता.

११ जुलै
मध्य प्रदेशात अतिवृष्टीचा इशारा, कोकण किनारपट्टी, गोवा, कर्नाटक आणि केरळची किनारपट्टी, पूर्व उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पूर्व राजस्थान आणि दक्षिण कर्नाटकचा काही भाग या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता, अंदमान-निकोबार, ओडिशा, पश्चिम उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, गुजरात आणि उत्तर छत्तीसगढमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता.

१२ जुलै
मध्य प्रदेश, कोकण किनारपट्टी, गोवा, कर्नाटक आणि केरळची किनारपट्टी या ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा. पूर्व उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पूर्व राजस्थान आणि दक्षिण कर्नाटकचा काही भाग, अंदमान-निकोबार, ओडिशा, पश्चिम उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, गुजरात राज्य आणि उत्तर छत्तीसगढमध्ये जोरदार पावसाची शक्यता.

१३ जुलै
पूर्व आणि उत्तर पश्चिम हिंदुस्थानात अतिवृष्टीचा इशारा. कोकण किनारपट्टी, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात अतिवृष्टीचा इशारा.

अंधेरीत विहिरीत बुडून मुलाचा मृत्यू
अंधेरीतील आरे पाइपलाइन, विजय नगर चेक पोस्ट येथे विहिरीत विशाल आंबोरे या १५ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला.

-वडाळा इंडियन ऑइल येथील संरक्षक भिंत पावसामुळे कोसळली. या घटनेतही कुणीही जखमी झाले नसले तरीही भिंतीशेजारी पार्क करण्यात आलेल्या गाडय़ांचे नुकसान झाले. दरम्यान, शहरात ३, पूर्व उपनगरात २ आणि पश्चिम उपनगरात १५ अशा एकूण २० ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या.

वसईत शॉक लागून तरुणाचा मृत्यू
घरावर असलेल्या पत्र्याच्या शेडला हात लागल्याने शॉक लागून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज रात्री घडली. मार्क एडवीन सिक्वेरा असे त्याचे नाव आहे. वसईतील गिरीज या गावात तो राहात होता. पत्र्याच्या शेडला लागून इलेक्ट्रिकचा खांब आहे. त्याचा वीजप्रवाह शेडमध्ये उतरल्याने मार्कचा स्पर्श पत्र्याच्या शेडला होताच त्याला जबरदस्त शॉक लागला आणि तो खाली कोसळला.

जुहू चौपाटीवर तिघांना वाचवले
जुहू चौपाटीवर दोन दिवसांपूर्वीच पाच जण बुडाल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा तिघांचा जीव सुदैवाने वाचला. कुर्ला येथील प्रवीण बवनकर (२८), दिगंबर जोगधनकर (२६) आणि दत्तात्रय शेरखने (३०) हे तीन तरुण बुडत असल्याचे वेळीच लक्षात आल्यामुळे लाइफ गार्डनी धाव घेऊन त्यांना वाचवले.

मुंबईतील पाऊस   (मिमीमध्ये)
चेंबूर                १८४.२
गोरेगाव             १६२.२
कुलाबा             १६७.३७
भायखळा           १५५.४
वडाळा             १४१.९६
वरळी              १६५.०९
कुर्ला               १३७.१३
ब्रिटानिया          १३८.६६
विक्रोळी           १०६.८७

सध्याचा पाणीसाठी    (दशलक्ष लिटरमध्ये)
अप्पर वैतरणा           ४००१६
मोडक सागर            १०२४४२
तानसा                   ८०८७९
मध्य वैतरणा             ८२७४०
भातसा                   २०३२३२
विहार                    १५०१२
तुलसी                    ६७६४
एकूण                    ५३१०८४