पाऊस पावला! तलाव भरू लागले!! दीड महिन्याचा पाणीसाठा जमा

801

मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या तलावक्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तलाव भरू लागले आहेत. सातही तलावांत मिळून सध्या 1,60,692 दशलक्ष लिटर पाणी जमा झाले असून, हे पाणी सुमारे दीड महिना पुरणारे आहे. यातच हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस जोरदार पाऊस होणार असल्यामुळे मुंबईकरांना पाणीपुरवठा करणारे तलाव लवकरच तुडुंब भरणार आहेत.

मुंबईला मोडक सागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात धरणांमधून दररोज 3800 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही जून कोरडा गेल्याने तलाव कधी भरणार? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, गेल्या जुलैच्या सुरुवातीपासूनच मुंबईसह पाणीपुरवठा करणार्‍या तलावांतही जोरदार पाऊस सुरू असल्याने तलावांत वेगाने पाणीसाठा जमा होऊ लागला आहे. दरम्यान, पावसाळा संपल्यानंतर 1 ऑक्टोबरला तलावांतील उपलब्ध पाण्याचा आढावा घेतला जातो. यानुसार मुंबईकरांना होणार्‍या पाणीपुरवठय़ाचे नियोजन केले जाते. यामध्ये सातही तलावांत मिळून वर्षभरासाठी 14,47,363 दशलक्ष लिटर पाणी असणे आवश्यक असते.

दोन दिवसांत 14 दिवसांचा जलसाठा

मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या सात तलावांत दरवर्षी जमा होणार्‍या एकूण 14,47,363 दशलक्ष लिटर पाणीसाठय़ापैकी शनिवारी फक्त आठ टक्के पाणीसाठा जमा झाला होता. मात्र, गेल्या दोन दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे हा पाणीसाठा 11 टक्के झाला आहे.

दोन दिवसांत पाणीसाठय़ात 51 हजार 685 दशलक्ष लिटर म्हणजेच पाच हजार 168 कोटी लिटरची भर पडली आहे. दररोजच्या पाणीपुरवठय़ात दोन दिवसांत सुमारे 14 दिकसांच्या पाणीसाठ्याची भर पडली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

6 जुलैचा पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)

तलाव                पाणीसाठा           टक्केवारी

मोडक सागर       28,343                 21.98

तानसा             15,709                 10.83

मध्य वैतरणा       21,847                 11.29

भातसा            80,268                 11.19

विहार          9976                    36.02

तुळशी          4548                   56.53

एकूण         1,60,692              11.10

आपली प्रतिक्रिया द्या