
ऑक्टोबर अखेरीपर्यंत परतीचा पाऊस मुक्काम ठोकून राहिला. त्यामुळे उशिराने दाखल झालेल्या थंडीची तीव्रता आता वाआहे. रविवारी पहाटे किमान तापमानात अचानक 3 अंशांची घट झाली आणि मुंबईच्या हवेत गारवा पसरला. पुढील दोन दिवसांत तापमानात आणखी घसरण होईल आणि थंडीचा कडाका वाअसा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
गेल्या आठवड्यापासून मुंबई तसेच उर्वरित महाराष्ट्रात थंडीची चाहूल लागली आहे. मागील तीन-चार दिवसांत थंडीची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाली आहे. यादरम्यान रविवारी पहाटे सांताक्रुझमध्ये किमान तापमान 18 अंश इतके नोंद झाले. शनिवारी 21.2 अंश इतके तापमान होते. त्यात 3 अंशांची घट झाली. तसेच कमाल तापमान 31.8 अंशांपर्यंत खाली आले. कुलाब्यात 22.4 अंश किमान तापमान नोंदवले गेले. राज्यात सध्या कोरड्या हवेचा प्रभाव असून आकाश निरभ्र राहणार आहे. याचदरम्यान सकाळी आणि संध्याकाळी थंडीचा कडाका वाढणार आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान 12 ते 15 अंशांपर्यंत खाली जाईल. मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या शहरांमध्ये सकाळी गार वारे प्रवाहित राहतील, असे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे मुंबईकरांसह राज्याच्या बहुतांश भागांतील नागरिकांना पुढील आठवडाभरात गुलाबी थंडीचा आनंद घेता येणार आहे.
आठवडाभर तापमान 20 अंशांच्या खालीच
परतीच्या पावसामुळे मुंबईकरांना दिवाळीत विचित्र वातावरणाला तोंड द्यावे लागले. मात्र पुढील आठवडा मुंबईकरांसाठी सुखद गारवा देणार आहे. शहराचे किमान तापमान 15 नोव्हेंबरपर्यंत 20 अंशांच्याच खाली राहील, असे भाकीत हवामान खात्याने केले आहे. त्यानंतरही गारठा वाढण्याची शक्यता हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे मुंबईकरांना हुडहुडीपासून वाचण्यासाठी स्वेटर बाहेर काढावे लागण्याची चिन्हे आहेत.
प्रदूषित हवेची डोकेदुखी
रविवारी सलग तिसऱ्या दिवशी मुंबईच्या हवेची गुणवत्ता ‘खराब’ श्रेणीत नोंद झाली. शहराच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक 103 अंकांवर नोंदवला गेला. हवेत प्रदूषण असल्याने मुंबईकरांना आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्यतज्ञांनी केले आहे. मुंबईच्या हवेत श्वासोच्छ्वास घेणे हे दिवसाला दोन सिगारेटचा धूर शरीरात जाण्याइतपत घातक असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.






























































