वर्क  फ्रॉम होमची सवय झालीय, पण प्रत्यक्ष कामातील थ्रिल गायब! कंटाळलेल्या मुंबईकर कर्मचाऱ्य़ांची व्यथा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना लॉकडाऊनमुळे  कंपनी अथवा कार्यालयातील कार्यबाहुल्याचा भाग म्हणून गेले पाच महिने आम्हाला ’वर्क  फ्रॉम होम’ पद्धतीची सवय झालीय. पण या कामात कार्यालयीन कामाची मजा आणि थ्रिल मुळीच जाणवत नाही. अशा कामाने उत्पादनक्षमतेचा मात्र पार बोऱ्य़ा वाजलाय. कोरोना महामारीमुळे अनुभवावे  लागणारे  यंत्रवत आणि निरस जीवन आता कंटाळवाणे वाटू लागलेय अशी व्यथा घरातूनच ऑनलाईन कार्यालयीन काम करणाऱ्य़ा मुंबईकरांनी व्यक्त केली आहे. त्यातच घरातील तुटपुंजी जागा आणि मंदावलेल्या इंटरनेट सेवेच्या अडचणीतून मार्ग काढत कार्यालयीन काम पूर्ण करण्याचे आव्हान पेलणे म्हणजे तारेवरची कसरत असल्याचे मत कर्मचाऱ्य़ांनी बोलून दाखवले आहे.

कोरोना संसर्गामुळे कार्यालयातील प्रत्यक्ष वातावरण आणि मानसिक समाधान या कामातून मुळीच अनुभवता येत नाहीय अशी मुंबईकर कर्मचाऱ्य़ांची केविलवाणी अवस्था सध्या झाली आहे. त्यातच मुंबईतील घरे छोटी असल्याने नागरिकांना आपली प्रायव्हसी गमवावी लागत आहे. घरात बसून सतत काम केल्याने कामगारांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.  

कोरोनाची कथा एक व्यथा अनेक

मुंबईतील एक पत्रकार विजय सिंग म्हणतात, कोविड-19 च्या संसर्गामुळे आम्हाला नाईलाजाने कार्यालयीन काम घरून करावे लागतेय. पण जागेचा तुटवडा, मंद इंटरनेट आणि मोबाईल रेंजच्या तुटीमुळे आमचे वर्क  फ्रॉम होम अतिशय जिकिरीचे आणि कंटाळवाणे झालेय.कधी एकदा आपल्या दैनिकाचे कार्यालय पूर्ण सुरु होतेय असे आता वाटायला लागलेय. स्क्केअरफिट इंडिया या रिअल इस्टेट वेब पोर्टलचे संस्थापक करुण सिंग म्हणाले ,मुंबईत एक तर आपल्या घराचे क्षेत्रफळ मर्यादित. त्यात आपल्या मुला-बाळांसह घरात कार्यालयाचे काम करणे म्हणजे तारेवरची कसरत. त्यातच मुलांचे शिक्षणही ऑनलाईन झाल्याने घरात एकच  लॅपटॉप अथवा संगणक असेल तर आपल्या कामासाठी प्रत्येकाला प्रतीक्षा करावीच लागणार. मग वेळेत कार्यालयीन काम कसे उरकता येणार, अशी व्यथा व्यक्त केली.