मुंबईकरांवर नवा अदानी टॅक्स, अदानीच्या हजारो ‘रेंटल’ घरांसाठी पालिका 2368 कोटी खर्च करणार

धारावी पुनर्विकास प्रकल्पात अपात्र ठरणाऱ्या रहिवाशांना ‘रेंटल’ घरात ठेवले जाणार आहे. यासाठी अदानी धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड 50 हजार घरे बांधणार आहे. ही घरे बांधण्यासाठीच देवनार डंपिंग ग्राऊंड रिकामी करण्यास पालिकेने ऑक्टोबर 2024 मध्ये मंजुरी दिली. अदानीच्या या 50 हजारांवर रेंटल घरांसाठी पालिका तब्बल 2368 कोटी खर्च करणार असल्याची माहिती आज शिवसेना नेते आमदार अ‍ॅड. अनिल परब यांनी विधान परिषदेत दिली.

अदानीला घरे बांधण्यासाठी पालिका देवनार डंंपिग ग्राऊंडची जागा देणार आहे. मात्र या जागेवरील कचरा उचलावा लागणार आहे. या ठिकाणचा 185 लाख मेट्रिक टन कचरा  मुंबई महानगर पालिका उचलून देणार आहे. यासाठी 2368 कोटी रुपये महापालिकेला खर्च करावे लागणार आहेत. घनकचरा व्यवस्थापनातील हे आतापर्यंतचे सर्वात मोठे टेंडर आहे. तीन वर्षांसाठी हे टेंडर काढण्यात आले आहे. 23 हजार मेट्रिक टन कचरा रोज उचलायचा आहे. हा खर्च मुंबई महापालिका करणार आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या हक्काचे पैसे अदानीवर खर्च होणार असल्याचा आरोपही अनिल परब यांनी केला आहे.

कचरा उचलण्याचे कामही अदानीची कंपनी करणार

धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी अदानीला 311 एकर जमीन दिली जात आहे. मात्र या प्रकल्पात अपात्र ठरणाऱ्यासाठी अदानी देवनार डंपिंग ग्राऊंडची जागा वापरणार आहे. विशेष म्हणजे देवनार डंपिंग ग्राऊंड स्वच्छ करून देण्याचे कामही अदानीच्याच कंपनीला देण्यात येणार आहे. यासाठी तीन वेळा निविदा काढण्यात आल्याचा आरोपही अ‍ॅड. अनिल परब यांनी केला आहे. 185 लाख मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तीन वर्षांसाठी निविदा काढली गेली असल्याचेही त्यांनी सांगितले.