मुंबईतील १३ हजार विद्यार्थी नव्वदीपार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. आता खरा ‘निकाल’ लागणार आहे तो अकरावी प्रवेशाचा. मुंबई विभागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता यंदा वाढली असून १३ हजार ३२९ विद्यार्थी नव्वदीपार आहेत तर चौघांना १०० टक्के गुण मिळालेत. यात भर पडणार आहे ती आयसीएसई, सीबीएसई व इतर बोर्डाच्या टॉपर्सची. अकरावीच्या ३ लाख १ हजार ७६० जागा उपलब्ध असून फक्त एसएससी बोर्डातील विद्यार्थ्यांची संख्याच तीन लाखांच्या वर आहे. त्यातच इतर बोर्डातील दहावीचे उत्तीर्ण विद्यार्थी लक्षात घेता नामांकित कॉलेजमध्ये प्रवेशासाठी तुफान मारामार होणार हे नक्की.

मिळालेले गुण आणि गेल्या वर्षीची कटऑफ पाहून कॉलेज निवडा
अकरावी प्रवेशासाठी उत्सुक विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुण आणि गेल्या वर्षीची कटऑफ पाहूनच कॉलेज निवडावे असे आवाहन शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी केले आहे. शक्यतो घराजवळच्या कॉलेजचा पर्याय ऑनलाइन अर्जात नोंदवावा.अकरावीच्या जागा ३,०१,७६०, एसएससी उत्तीर्ण विद्यार्थी ३,०६,१५१

कोकणात एकही कॉपी नाही
दहावीच्या परीक्षेत एकूण ६६१ गैरप्रकार झाले. त्यामध्ये ५९६ ठिकाणी कॉपी झाली. ६ ठिकाणी तोतयागिरीचा प्रकार घडला आहे. इतर ५९ प्रकार झाले. संभाजीनगरमध्ये सर्वाधिक १४२ प्रकार घडले आहेत. कोकण विभागात कॉपीचा एकही प्रकार घडलेला नाही. अमरावती १०३ आणि लातूर विभागात १०० ठिकाणी कॉपी झाली. मुंबईत ५४ कॉपी घडल्या.

डोंबिवलीची श्रुतिका महाजन, रिद्धी करकरे हिला १०० टक्के गुण
दहावीच्या परीक्षेत डोंबिवलीच्या श्रुतिका महाजन व रिद्धी करकरे या दोघींना १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. श्रुतिका ही पाटकर शाळेची तर रिद्धी ही टिळकनगर हायस्कूलची विद्यार्थिनी आहे. श्रुतिकाला या यशाची अपेक्षा नव्हती. रिद्धीला आयएएस व्हायचे आहे, तर श्रुतिकाला सायन्सला प्रवेश घ्यायचा आहे.

आधी कॅन्सरवर मात, मग परीक्षेत यश
ऐन दहावीच्या वर्षात कॅन्सरशी लढा देणाऱया नेहा कोनार या विद्यार्थिनीला दहावीच्या परीक्षेत ८४ टक्के गुण मिळाले आहेत. नेहा सेंट लॉरेन्स शाळेत शिकत असून दहावीत शिकत असतानाच तिच्यावरील कॅन्सरचे उपचार पूर्ण झाले. नेहाने आधी कॅन्सरवर मात केली. त्यानंतर रूसमध्ये पार पडलेल्या ऑलिम्पिकमध्येही तिने चमकदार कामगिरी केली. आता ती पूर्ण बरी झाली असून दर तीन महिन्यांनी चेकअपसाठी टाटा रुग्णालयात जात आहे. पुढे जाऊन तिला डॉक्टर बनण्याची इच्छा आहे.

वृत्तपत्र विक्रेत्याचा मुलगा चमकला
लालबाग येथील वृत्तपत्र विक्रेते वैभव भोईटे यांचा मुलगा यश भोईटे यांने सेंट झेवियर हायस्कूलमधून दहावीत ९१ टक्के गुण मिळवले. त्याबद्दल बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ व लोअर परळ वृत्तपत्र विक्रेता संघाने त्याचे अभिनंदन केले आहे.

शाखानिहाय अकरावीच्या उपलब्ध जागा
आर्टस् – ३५ हजार ३२०
कॉमर्स – १ लाख ६५ हजार ३३०
सायन्स – ९४ हजार ७७०
एचसीव्हीसी – ६ हजार ३४०

९०.४१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
मुंबई विभागाचा दहावीचा निकाल ९०.४१ टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात ०.३२ टक्क्यांची वाढ झाली आहे. निकालाचे वैशिष्टय़ म्हणजे मुंबई विभागातील २९ हजार ६४८ विद्यार्थ्यांना कला, क्रीडा कोटय़ातील वाढीव गुणांची सवलत मिळाली आहे. चित्रकलेत सर्वाधिक २८ हजार २०० विद्यार्थ्यांना तर शास्त्राrय नृत्य प्रकारात ७३३ विद्यार्थ्यांना वाढीव गुण मिळाले आहेत. त्याखालोखाल ३८७ विद्यार्थ्यांना क्रीडा कोटा, वादन १७५, शास्त्राrय गायन १४१, लोककला आणि नाटक कोटय़ाचा लाभ अनुक्रमे ४ आणि ८ विद्यार्थ्यांना मिळाला आहे.

हेल्पलाइन
परीक्षा आणि निकालासंदर्भात काही अडचण असल्यास विद्यार्थी आणि पालकांनी मुंबई विभागीय मंडळाच्या २७८९३७५६ किंवा २७८८१०७५ या क्रमांकांवर संपर्क साधायचा आहे. ही हेल्पलाइन ६ जूनपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत सुरू राहणार आहे.

मराठी, इंग्रजी, तामीळ, गणित, विज्ञान, सामान्य गणित कठीण
दहावीच्या विद्यार्थ्यांना भाषा विषयासह गणित, विज्ञान-तंत्रज्ञान, सामान्य गणित आणि तामीळ हे विषय कठीण जात आहेत. मुंबई विभागाचा मराठीचा निकाल ८८.८९ टक्के लागला असून तामीळ ७९.७५, इंग्रजी ८८.५१, गणित ८७.८७, विज्ञान-तंत्रज्ञान ९१.३९, सामान्य गणित ७८.२७ असा निकाल लागला आहे. एकूण ११ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

विभागवार निकालाची टक्केवारी
कोकण – ९६
कोल्हापूर – ९३.८८
पुणे – ९२.०८
मुंबई -९०.४१
संभाजीनगर – ८८.८१
नाशिक -८७.४२
अमरावती – ८६.४९
लातूर – ८६.३०
नागपूर – ८५.९७

-दहावीत राज्यातील १२५ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले असून यातील तब्बल ७० विद्यार्थी हे लातुरातील आहेत तर संभाजीनगरातील २३ विद्यार्थ्यांनी १०० टक्के मिळविले आहेत. विशेष म्हणजे कॉपीची सर्वात जास्त प्रकरणे या दोन विभागांतच उघडकीस आली आहेत.

कला, क्रीडा कोटय़ातील गुण ग्राह्य धरून विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळत आहेत. लातूर आणि संभाजीनगरात सर्वाधिक कॉपी आणि सर्वाधिक १०० टक्के गुण मिळविणारे विद्यार्थी यांचा फारसा संबंध लावता येणार नाही.
-शकुंतला काळे, अध्यक्ष,
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ.