हवा बिघडली, यंत्रणा गॅसवर! वाढत्या प्रदूषणानंतरही मुंबईत फटाक्यांची विक्रमी विक्री, टेन्शन वाढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हवेची गुणवत्ता प्रचंड खालावल्यामुळे मुंबईसह महाराष्ट्राची तब्येत बिघडली असून सर्दी-खोकला, ताप आणि श्वसनाच्या आजाराचे रुग्ण 20 टक्क्यांनी वाढले आहेत. यातच उच्च न्यायालयानेदेखील बिघडलेल्या हवेची गंभीर दखल घेत शुक्रवारपर्यंत हवेची गुणवत्ता सुधारा, असे बजावत कठोर निर्णयाचा इशारा राज्य सरकार आणि पालिकेला दिल्यामुळे संपूर्ण यंत्रणेची धावपळ उडाली आहे. मंत्रालयात बैठकांचे जोरदार सत्र सुरू असून प्रदूषण नियंत्रण मंडळानेही कठोर नियमावली जारी केली आहे. सर्व 24 वॉर्डमध्ये एकूण 95 भरारी पथकांच्या माध्यमातून मुंबईभरात झाडाझडती घेण्यात येत आहे.

  मुंबईत गेल्या काही दिवसांत हवेची गुणवत्ता प्रचंड खालावल्याने नागरिकांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम होत आहेत. हायकोर्टाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाकडून नियमांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. धूळ रोखण्यासाठी सर्व 24 वॉर्डात जेटिंग मशीनने रस्त्यांवर पाण्याची फवारणी सुरू करण्यात आली आहे.

डेब्रिज वाहतुकीला बंदी

हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी शुक्रवारची डेडलाइन न्यायालयाने दिल्यामुळे पुढील तीन दिवस पालिकेने मुंबई डेब्रिज वाहतुकीला बंदी घातली आहे.

धूर ओकणाऱ्या चिमण्यांवर कारवाई

काळबादेवी परिसरात सोने-चांदी गाळणाऱ्या व्यावसायिकांच्या चिमण्यांमधून येणारा वायू-धूर प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्याचे समोर आल्यामुळे पालिकेने  चार भट्टी-धुराडे तोडून नष्ट केली.

श्वसनाच्या आजाराचा धोका

प्रदूषण आणि वातावरण बदलांमुळे श्वसनाचे आजार असलेल्यांना ‘व्हायरल इन्फेक्शन’ लवकर होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यामध्ये सर्दी-खोकला, तापासह दम्यासारखा आजार असलेल्या रुग्णांना जास्त त्रास होत आहे.

शीव, नायर, केईएम, जे. जे. रुग्णालयात श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांची संख्या 20 टक्क्यांनी वाढली आहे. हे आजार टाळण्यासाठी गरम पाणी पिणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे, मास्क वापरणे, स्वच्छता राखणे आवश्यक असल्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे.

दोन काँक़्रीट प्लांटना  काम बंद नोटीस

काँक्रीट बनवणारे ‘आरएमसी’ प्लांट बंदिस्त करून काम करावे, असे निर्देश धाब्यावर बसवल्याचे समोर आल्याने दोन प्लांटला काम बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

रेल्वेला नोटीस बजावणार

 सांताक्रुझ स्थानकावर प्रदूषण रोखणारी कोणतीही खबरदारी न घेता काम सुरू असल्याने रेल्वेला नोटीस बजावण्यात येणार असल्याचे  एच/पश्चिम विभागाकडून सांगण्यात आले.

सरकार टास्क पर्ह्स स्थापन करणार

प्रदूषित हवेमुळे उद्भवणाऱ्या आजारांचा अभ्यास व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी राज्यस्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार आहे. आठवडाभरात टास्क पर्ह्स सदस्यांची निवड केली जाईल, असे आरोग्य सेवा विभागाचे सहसंचालक डॉ. प्रतापसिंह सारणीकर यांनी दिली.

सिंधुदुर्गात पावसाच्या हलक्या सरी

राज्यातील हवामानात बदल झाला आहे. कोकणात सिंधुदुर्ग जिह्यात काल आणि आज पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. कुडाळ, कसाल आणि कणकवलीमध्ये गडगडाटासह पाऊस झाला. पावसामुळे कणकवलीच्या बाजारात काही वेळ वाहतूककाsंडी झाली होती.

देशातील प्रमुख शहरांना प्रदूषणाचा विळखा

देशभरातील प्रमुख शहरांतील हवेची गुणवत्ता ढासळली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या माहितीनुसार, दिल्लीतील हवेची गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 394 नोंदले गेले. देशातील टॉप 10 प्रदूषित शहरांच्या यादीत सर्वात वर उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा असून दुसऱ्या स्थानावर हरयाणातील फतेहबाद शहर आहे. राजस्थानमधील गंगानगर, हरियाणाचे हिसार, जिंद, राजस्थानचे धौलपूर, दिल्ली, राजस्थानचे भिवाडी, हरियाणाचे सोनीपत, फरिदाबाद या 10 शहरांचा या यादीत समावेश आहे.

‘बीकेसी’, कुलाबा, मालाड, चेंबूर ‘हॉटस्पॉट’

मुंबईत हवेचा दर्जा कमालीचा खालावला असून मंगळवारीदेखील  ‘बीकेसी’, कुलाबा, मालाड आणि चेंबूर येथील हवेच्या गुणवत्तेचा दर्जा अत्यंत खराब नोंदविण्यात आला आहे. ‘सफर’ संस्थेच्या सर्वेक्षण आकडेवारीनुसार चारही ठिकाणांवरील हवा अत्यंत खराब श्रेणीत आहे. यामध्ये पश्चिम उपनगर सर्वाधिक प्रदूषित आहे. यामध्ये चेंबूरचा एकआयक्यू 303, ‘बीकेसी’ – 228, मालाड – 203  आणि कुलाबा येथे 208 एक्यूआय नोंदवण्यात आला आहे.

प्रदूषण करणाऱ्या ‘साईट्स’ तत्काळ सील करा

प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर बांधकामाच्या ठिकाणी प्रदूषण करणाऱ्या साईटना स्टॉप वर्क नोटीस किंवा साईटस तत्काळ सील करण्याचे आदेश राज्याच्या पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी सर्व महापालिकांना जारी केले आहेत. मुंबईसह राज्यातल्या प्रमुख शहरांमधील हवेची गुणवत्ता खालावली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्य सचिवांनी राज्यातल्या सर्व महापालिकांच्या आयुक्तांसोबत बैठक घेतली आणि प्रदूषण करणाऱ्या बांधकाम ठिकाणांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश जारी केले आहेत.

सहा हजार बांधकामांना नोटिसा

मुंबईत सुरू असलेल्या सहा हजारांवर बांधकामांच्या ठिकाणाहून उडणाऱ्या धुळीमुळे प्रदूषणात वाढ झाल्याचे हवामान तज्ञांकडून स्पष्ट करण्यात आल्यामुळे पालिकेकडून कठोर नियमावलीदेखील जारी करण्यात आली आहे. बांधकाम सुरू असलेल्या सर्व सहा हजार आस्थापनांना नोटीस बजावून नियम मोडल्यास काम थांबवण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

पालिकेत आज महत्त्वपूर्ण बैठक

मुंबई उच्च न्यायालयाने पालिकेला हवेचा दर्जा सुधारण्यासाठी शुक्रवारपर्यंत डेडलाइन दिल्याने पालिका प्रशासनाची अक्षरशः धावपळ उडाली आहे. त्यामुळे ठोस उपाययोजनांसाठी पालिकेतही बैठकांचे सत्र सुरू असून उद्या बुधवारी पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. यामध्ये हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी नियमावली आणखी कठोर होण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

बुलडोझर चालवावा लागेल

दिल्लीलगतच्या पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान राज्यांत शेतातील गवत खुंट जाळण्याचे प्रकार ताबडतोब रोखावेत, अन्यथा आम्हाला कारवाईचे आदेश द्यावे लागतील. आम्ही कारवाई सुरू केली तर बुलडोझर थांबणार नाही, असे आज सर्वोच्च न्यायालयाने बजावले.

या फटाक्यांवर बंदी

सर्वेच्च न्यायालयाने बेरियमपासून तयार करण्यात आलेल्या फटाक्यांवर बंदी घातली आहे. हे निर्देश देशातील सर्व राज्यांसाठी लागू आहेत, असे न्यायालयाने नमूद केले आहे.

फटाक्यांसाठी झुंबड

फटाक्यांमुळे निर्माण होणारा धूर प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्यामुळे दिवाळीत सायंकाळी 7 ते रात्री 10 या वेळेतच फटाके पह्डावेत असे आदेश देण्यात आले आहेत. असे असताना मुंबईभरात सध्या नाक्यानाक्यांवर फटाके विव्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. या ठिकाणी फटाके खरेदीसाठी झुंबड उडत असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 25 टक्क्यांनी फटाके खरेदी वाढली आहे.