
मुंबईतील वाढत्या प्रदूषणाचा गंभीर प्रश्न कायम आहे. रविवारी शहर आणि उपनगरांतील अनेक भागांत हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 170 ते 272 अंकांच्या चिंताजनक पातळीवर नोंद झाला. वडाळ्यात सर्वाधिक 272 एक्यूआयची नोंद झाली. शहराची हवा अजूनही मुंबईकरांच्या आरोग्यासाठी घातक असल्याचा निष्कर्ष हवामान विभागाने काढला आहे. वाढते प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारच्या विविध यंत्रणा आणि महापालिका प्रशासन कुचकामी ठरल्याचे यातून उघड होत आहे.
वाढत्या प्रदूषणाच्या गंभीर प्रश्नाने मुंबईची चिंता वाढली आहे. गेल्या आठवड्यापासून प्रदूषणाने विक्रमी पातळी गाठून दिल्लीलाही मागे टाकले आहे. याचे गांभीर्य अधोरेखित करीत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाला प्रदूषण नियंत्रणासाठी तातडीने ठोस पावले उचलण्याचे निर्देश दिले. मात्र न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतरही प्रशासकीय यंत्रणा अद्याप प्रदूषणाची पातळी कमी करण्यात यशस्वी ठरलेल्या नाहीत. रविवारी संपूर्ण शहराच्या हवेचा सरासरी गुणवत्ता निर्देशांक 167 अंकांवर होता. प्रामुख्याने पीएम 2.5 आणि पीएम 10 प्रदूषकांच्या उच्च पातळीवर होते. त्यामुळे चिंता कायम राहिली आहे. शहराच्या प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत चालली आहे, वडाळा परिसरात 272 अंकांवर हवेचा गुणवत्ता निर्देशांक पोहोचल्याने श्वसनविकाराने त्रस्त असलेल्या नागरिकांची घुसमट झाली. तसेच कुलाबा, वरळी आणि वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्ससह इतर भागांत 170 ते 180 अंकांच्या दरम्यान हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाची नोंद झाली. पालिका प्रशासनाने आणखी कठोर कारवाईचा बडगा उगारला तरच प्रदूषित हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमी नागरिक व्यक्त करीत आहेत.
अनेक ठिकाणी पेटल्या शेकोट्या
पालिका प्रशासन दरवर्षी प्रदूषणाची पातळी वाढल्यानंतर शेकोटय़ा न पेटवण्याचे आवाहन करते. मात्र शहर आणि उपनगरांतील अनेक मनुष्य वस्तीत सर्रास शेकोट्या पेटवल्या जात आहेत. पालिका प्रशासन वॉर्डनिहाय कारवाईची ठोस पावले उचलत नसल्याचे स्पष्ट होत आहे. सद्यस्थितीत पालिकेने पर्ह्टसह अनेक भागांत हवा गुणवत्तेसंदर्भात खबरदारी घेण्याबाबत आवाहन करणारे डिजिटल फलक लावले आहेत.
पालिकेच्या कामांच्या ठिकाणी धुळीचे साम्राज्य
पालिकेमार्फत अनेक ठिकाणी रस्ते काँक्रीटीकरण आणि जलजोडणीची कामे सुरू आहेत. त्यासाठी जागोजागी खोदकाम करण्यात आले आहे. खासगी बांधकाम प्रकल्पांप्रमाणेच पालिकेच्या कामांच्या ठिकाणीदेखील धूळ प्रतिबंधक व्यवस्था दिसून येत नाही. त्यामुळे खोदकाम केलेल्या भागात गाडय़ांची वर्दळ सुरू असताना धुळीचे साम्राज्य पसरत आहे.



























































