मुंबईची संस्कृती पारोलिया देशात दुसरी; सीए परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट ऑफ इंडिया (आयसीएआयई) ने चार्टर्ड अकाऊंट (सीए) परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत जयपूरच्या मधुर जैनने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर मुंबईची संस्कृती पारोलिया देशात दुसऱया क्रमांकावर झळकली आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती.

सीए परीक्षेत मधुर जैनने 77.38 टक्के गुण तर संस्कृतीला 74.88 टक्के गुण मिळाले आहेत, तर जयपूर येथीलच टिपेंद्र सिंगल आणि ऋषी मल्होत्रा यांनी 73.55 टक्के गुण मिळवत संयुक्तपणे तिसरा क्रमांक मिळवला आहे. यंदा ग्रुप 1 मध्ये उत्तीर्णतेची टक्केवारी 9.46 टक्के तर चार्टर्ड अकाऊंटंट इंटरमिजिएट एक्झामिनेशन ग्रुप 2 ची टक्केवारी 21.6 इतकी आहे. दोन्ही ग्रुप मिळून निकालाची टक्केवारी 9.42 इतकी आहे.

परीक्षेच्या अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी icai.nic.in या वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सीए परीक्षेत देशात दुसरा क्रमांक पटकावलेल्या संस्कृतीचे शालेय शिक्षण बोरिवली येथील मेरी इमॅक्युलेट गर्ल्स हायस्कूल येथून झाले, तर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण एन. एम. कॉलेजमधून पार पडले. पुढे कॉमर्सच्या पदवी शिक्षणासाठी तिने एचआर कॉलेजमध्ये प्रवेश केला. पदवीबरोबरच ती सीए परीक्षेची तयारीदेखील करीत होती. तिला या परीक्षेत 800 पैकी 599 गुण मिळाले आहेत.